Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी महायुतीच्या माध्यमातून एकत्रित निवडणूक लढवण्याची घोषणा केली. यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. मात्र, या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर लगेचच ओरोस मंडळाचे अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यात त्यांनी म्हटले आहे की, “सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे मला उचित वाटत नाही. माझा कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक नाराजी नाही, तरीही हा राजीनामा त्वरित स्वीकारावा.” आनंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजीच्या साखळी प्रतिक्रिया दिसून आल्या. ओरोस मंडळातील ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदय कुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह बूथ अध्यक्ष, शक्ति केंद्रप्रमुखांसह एकूण ४३ पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना सादर करण्यात आले असून, पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे. नाराजीचे कारण आणि पार्श्वभूमी खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकत्र येऊन निवडणुका लढवणार असल्याचे आजच जाहीर झाले. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अनेकांना वाटते की, या फॉर्म्युल्यात भाजपच्या हितांचे रक्षण झाले नाही, ज्यामुळे पक्षातील नाराजीचे नाट्य उघड झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही घटना महायुतीच्या एकतेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे. निवडणुकी पूर्वीच पक्षांतर्गत असंतोष वाढल्याने पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.