दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा दुरावा नाही शनिवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या दिव्यज फाऊंडेशनच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस परस्परांपासून अंतर राखून बसल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाले होते. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असणाऱ्या दोन खुर्च्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासाठी राखून ठेवण्यात आल्या होत्या. प्रत्येक खुर्चीवर पाहुण्यांची नावेही लिहली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे हे कार्यक्रमस्थळी आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पाहून त्यांच्यापासून अंतर राखून बसले, यामध्ये तथ्य नाही. दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा दुरावा नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले. =================== सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचं – अंधारे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या उपनेत्या सुषमा अंधारे या आमच्या पक्षात प्रवेश करणार होत्या असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांनी दिल्लीत खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेतली होती असं सामंत यांनी म्हटलं होतं. याला आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचं आहे असं अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच उदय सामंत हे शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे अंधारे यांनी म्हटलं आहे. याबाबत सुषमा अंधारे यांनी एक फेसबुक पोस्टही लिहिली आहे.या पोस्टमधून अंधारे यांनी उदय सामंत यांनी केलेले दावे फेटाळून लावलेत. आता यावरुन पुढे काय काय घडणार आणि उदय सामंत यावर काय उत्तर देतील का? हे पाहणं महत्त्वाचं असेल. ==================== मतदानापूर्वीच भाजपने लक्षणीय आघाडी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. पण मतदानापूर्वीच भाजपने लक्षणीय आघाडी मिळवली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत, भाजपाचे १०० नगरसेवक आणि तीन नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले. याचा अर्थ असा की अनेक प्रभागांमध्ये मतदानाची आवश्यकता नव्हती आणि भाजपचे उमेदवार विनाविरोध विजयी झाले. विरोधी पक्षांनी राज्याच्या अनेक भागात निवडणूक लढवण्याचा धोका पत्करला नाही. यामुळे भाजपला सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या संख्येने जागा मिळवता आल्या, ज्यामुळे पक्षाचे मनोबल आणि निवडणूक रणनीती दोन्ही मजबूत झाली. त्यामुळं पुढं होणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये विरोधक कोणती रणनीती आखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. =================================== महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची कीव येते सुनील तटकरे यांच्या भाजप पक्ष प्रवेश आणि पार्थ पवारांचा घात सुनील तटकरेंनी केला या आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दळवींवर हल्लाबोल केलाय. महेंद्र दळवी यांच्याकडे टीका करण्याशिवाय काहीच उरले नाही त्यामुळे ते अशी टीका करत आहेत. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा त्यांनी आरोप केलाय. त्यांच्या बालबुद्धीची मला कीव येत असून ते चिटर आमदार आहेत.सुनील तटकरे यांचे सर्व पक्षांशी घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे काय पक्ष प्रवेश केला असे नाही. ते सुनील तटकरे यांच्याबद्दल वेगळा भ्रम निर्माण करत आहेत, असे म्हणत त्यांनी आमदार दळवींच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलंय. ================== चिखलात कमळ असत-अक्षय महाराज भोसले गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप यांच्यात अंतर्गत धुसफूस असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत. या चर्चा होण्यामागे अनेक कारणे असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये झालेले पक्ष प्रवेश. यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. त्यानंतर या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्या प्रवक्त्याने सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्यांने भाजपचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका या पोस्टमधून केली आहे. शिवसेना प्रवक्ते अक्षय महाराज भोसले यांनी फेसबुकवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “चिखलात कमळ असत… पण राज्यात ते गटरात रुतलेलं होतं, तेव्हा जनतेच्या सेवेसाठी कोणी बाहेर काढलं? हे काही लोक लवकर विसरतात.” असा टोला लगावला आहे. या पोस्टमुळे भाजप-शिवसेनेते राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ============= १ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेश सुरु होणार संसदेचे हिवाळी अधिवेश येत्या १ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या कामकाजास अंतिम रूप देण्यास सरकारकडून सुरुवात झालीय. या अधिवेशनात सरकार एकूण १० विधेयके पारित करण्याचा विचाराधीन आहे. ज्यात खाजगी कंपन्यांना नागरी अणुऊर्जा क्षेत्र खुले करण्याची तरतूद असलेले विधेयक समाविष्ट आहे. भारतात अणुऊर्जेचा वापर आणि वापर नियंत्रित करण्यासाठी अणुऊर्जा विधेयक, २०२५ सादर केले जात आहे. त्यासोबतच या अधिवेशनाच्या सरकारच्या अजेंड्यावर उच्च शिक्षण आयोग विधेयक देखील आहे. एकूण १५ कामकाजाचे दिवस असलेले हे अधिवेशन १९ डिसेंबर रोजी संपेल. ======================= हायकमांडचा आदेश सर्वांना पाळावा लागेल कर्नाटकात उपमुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी शड्डू ठोकल्याने सिद्धरामय्यांची खूर्ची संकटात असल्याची चर्चा आहे. त्याच गटबाजी करणं माझ्या रक्तात नाही, सर्व 140 आमदार माझे आहेत, असं विधान डीके शिवकुमार यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या विधानाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रत्युत्तर दिल आहे. यावेळी त्यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत नेतृत्व बदल हा केवळ अंदाज आणि माध्यमांची निर्मिती आहे.”आमदारांना जाऊ द्या, पण हायकमांड जे काही म्हणेल ते आपण सर्वांनी पाळले पाहिजे. मी असो किंवा डीके शिवकुमार, सर्वांना ते पाळावेच लागेल.”असे म्हणत डिके यांना उत्तर दिलंय. ====================== अमेरिकेच्या टॅरिफचा भारतावर किती परिणाम झाला? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून आतापर्यंत त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या निर्णयांमध्ये सर्वाधिक चर्चा ही टॅरिफच्या निर्णयाची झाली.ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक देशांवर टॅरिफ लादलेलं असून भारतावर देखील एकूण ५० टक्के आयात शुल्क लादलेलं आहे. ट्रम्प यांच्या या टॅरिफच्या निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, अमेरिकेच्या टॅरिफचा भारतावर किती परिणाम झाला? याबाबत एका अहवालामधून मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या टॅरिफचा भारतावर किती परिणाम झाला? याबाबतचा एसबीआयचा एक अहवाल समोर आला असून अमेरिकेने लादलेल्या टॅरिफचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. तसेच उलट अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादल्यानंतर भारताची निर्यात वाढली असल्याचा दावाही करण्यात आलाय. ====================== कॅप्टनपदासाठी केएल राहुलचं खेळाडूचं नाव चर्चेत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी गुवाहाटीत सुरु झालीय. या कसोटीनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. दुसऱ्या कसोटीत भारताचं कर्णधारपद रिषभ पंतकडे सोपवण्यात आलंया. एकदिवसीय मालिकेसाठी शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळं उपलब्ध नसल्यास कर्णधारपद कोणाकडे दिलं जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. भारताचा माजी उपकर्णधार के. एल. राहुलचं नाव सध्या चर्चेत आहे. =========================== दुसऱ्या प्रेग्नन्सीसाठी सोनम कपूरचा ग्लॅमरस लूक बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. नुकतीच तिने आपल्या दुसऱ्या प्रेग्नन्सीची घोषणा केल्यानंतर शनिवारी सकाळी इंस्टाग्रामवर काही जबरदस्त स्टायलिश फोटो शेअर केले. क्षणात हे फोटो व्हायरल झाले आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. प्रत्येक वेळेसारखीच सोनमची मॅटरनिटी स्टाइल याही वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नव्या फोटोंमध्ये सोनम कपूर ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटेड टॉप आणि मॅचिंग स्कर्टमध्ये दिसते प्रत्येक पोझमध्ये सोनमचा आत्मविश्वास आणि स्टाइल झळकते. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे तिने सहज आणि सुंदर पद्धतीने फ्लॉन्ट केलेला बेबी बंप. तिच्या या मॅटरनिटी स्टाइलने पुन्हा एकदा बॉलिवूडची फॅशन क्वीन आहे सिद्ध केले.