लातूर : लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचारासाठी आलेल्या प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्व. विलासराव देशमुख यांच्या नावाचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केले. भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे कौतुक करताना चव्हाण म्हणाले, “लातूर महापालिकेची निवडणूक सुरू आहे. येथील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून लक्षात येते की लातूरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही.” या विधानाने राज्यभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. भाजप लातूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात चव्हाण बोलत होते. या मेळाव्यात संभाजी पाटील निलंगेकर, रमेश कराड, अभिमन्यू पवार, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार त्र्यंबक नाना भिसे, लातूर शहर भाजप जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, लातूर ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, संघटन मंत्री संजय घोडगे, अर्चना पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना उत्साहपूर्ण संबोधन करत काँग्रेसचा लातूरात सुपडा साफ करण्याचा संकल्प व्यक्त केला. चव्हाण यांच्या वक्तव्याला काँग्रेसकडून तीव्र विरोध झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले, “स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण झाला नाही. अनेक जण इच्छा बाळगून आले आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.” सपकाळ पुढे म्हणाले, “विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केले. आज सत्तेचा माज असलेले भाजप नेते लातूरात येऊन बरळतात की साहेबांच्या आठवणी पुसल्या जातील. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख साहेबांचे लातूरशी असलेले नाते? लातूरच्या कर्तृत्वसंपन्न सुपुत्राचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाहीत. भाजपवाल्यांनो, याद राखा – करारा जवाब मिळेल!” हयात नसलेल्या नेत्यावर असे वक्तव्य करणे हे राजकीय संस्कृतीला शोभादायक नसल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. लातूर महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची शक्यता असल्याने हे वक्तव्य निवडणुकीच्या रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाने लातूरातील राजकीय वातावरण तापले असून पुढील दिवसांत यावरून आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.