सिंधुदुर्ग : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठे शक्तिप्रदर्शन करताना भाजप नेते नारायण राणे यांनी कणकवली येथील कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे स्पष्ट संकेत दिले, तसेच एक जुना धक्कादायक किस्सा उघड केला. राणे म्हणाले, “या कार्यक्रमाचे आयोजन का केले याचा उद्देश मला सुरुवातीला समजलाच नव्हता. सर्वत्र ‘नारा एकच’ असे बॅनर लागले होते. विचारले तर कळाले की ‘नारा एकच’ म्हणजे नारायण राणे! मी भाजपमध्ये येताना स्पष्ट सांगितले होते की, भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे. मी मानाने जगणारा माणूस आहे. घमेंडी आहे, कोणापेक्षा कमी नाही असा अभिमान आहे. सगळी पदे कर्तृत्वाने मिळवली आहेत.” पुढे बोलताना राणे यांनी शिवसेना काळातील एक जुना प्रसंग सांगितला. ते म्हणाले, “मी एका उपशाखाप्रमुखाचा मर्डर करणार होतो. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला समजावले, म्हणून मी ते केले नाही.” हा प्रसंग नेमका कधीचा याबाबत मात्र स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. निवृत्तीच्या संकेत देताना राणे भावनिक झाले. ते म्हणाले, “मला आता कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. लोकसभेला उभे राहण्यापूर्वीही मी तिकीट नको असे सांगितले होते, पण जे. पी. नड्डा यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला राजकारणातून सोडणार नाही. आता मात्र कुठेतरी थांबायला हवे. दोन्ही मुले (नितेश आणि निलेश) राजकारणात आहेत, त्यांना नांदा सौख्यभरे असे सांगतो. माझ्यानंतर विकासाचे राजकारण ते करतील. राणे संपणार नाहीत, राणे कुटुंब एकत्र राहील. राणेंना संपवायला निघालेल्यांना सांगतो, राणे पुरून उरला आहे. माझी रास गुरू मजबूत आहे.” या कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि इतर नेते उपस्थित होते. राणे कुटुंबातील अंतर्गत मतभेदांवरही त्यांनी पडदा टाकला. आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.