भोपाळ : हजारो वर्षांपासून या उपखंडात राहणाऱ्या लोकांचा डीएनए एकच आहे. मात्र, आदिवासी आणि इतर समाजघटकांमध्ये गैरसमज निर्माण करून फूट पाडण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. अशा परिस्थितीत समाजातील विविध घटकांमध्ये संवाद आणि सामंजस्य अधिक वाढवण्याची आवश्यकता आहे. सामाजिक सलोखा हा भारतीय समाजाचा अविभाज्य आणि मूलभूत घटक असून, तो अधिक मजबूत करण्यासाठी निरंतर संवाद, परस्पर विश्वास आणि सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी केले. भोपाळमधील कुशाभाऊ ठाकरे सभागृहात आयोजित सामाजिक सलोखा बैठकीला भागवतांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, कायदे समाजाचे नियमन करू शकतात, परंतु सद्भावना आणि आपुलकीच समाजाला खऱ्या अर्थाने जोडून ठेवते. विविधतेतील एकता ही भारताची ओळख असून, बाह्यतः वेगळे दिसत असलो तरी राष्ट्र, संस्कृती आणि आध्यात्मिक पातळीवर आपण सर्व एक आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन सत्रांमध्ये झालेल्या या बैठकीत संघाच्या मध्य भारत विभागातील १६ प्रशासकीय जिल्ह्यांतील विविध सामाजिक गट, संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पहिल्या सत्रात आध्यात्मिक प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी समाजाच्या राष्ट्रासाठीच्या योगदानावर चिंतन करण्याची गरज व्यक्त केली आणि धर्मांतरांविरुद्ध सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. बैठकीत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, आर्थिक सहाय्य आणि सांस्कृतिक संवर्धनासंबंधी उपक्रमांवर चर्चा झाली. या चर्चांमध्ये विविध विषयांमध्ये सरकारच्या हस्तक्षेपाची वाट न पाहता सामूहिक प्रयत्नांद्वारे प्रश्न सोडवावेत, असा ठराव देखील संमत करण्यात आला.