कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. केवळ घोषणा केल्या जात आहेत, असा आरोप सतेज पाटील करत असतील तर प्रत्यक्ष सुरू असलेली कामे कंत्राटदार पैसे मिळण्याआधी करतील का, असा थेट सवाल क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे. विकासकामे ही कागदावरची नसून प्रत्यक्षात सुरू आहेत. त्यामुळे चुकीच्या नेरिटीव्हवर पुन्हा एकदा जनता फसणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. विधानसभेप्रमाणेच आता महापालिकेतही कोल्हापूरकर जनता घंटी वाजवून आपला कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणे ही आमची चूक होती, असे मान्य करताना, त्या काळातही आम्हाला फारसा अधिकार देण्यात आला नव्हता, असा आरोप क्षीरसागर यांनी केला. परिवहन सभापतीपद मिळाल्यानंतर मात्र आम्ही शेकडो कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून दाखवले, हे त्यांनी ठळकपणे अधोरेखित केले. आगामी काळात कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ कोणत्याही क्षणी होऊ शकते, याकडे लक्ष वेधत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत संपूर्ण राज्याला माहिती असल्याचे ते म्हणाले.