मुंबई : जैन समाजाचे नेते तथा मुन्नी निलेशचंद्र यांनी कबुतरांना दाणा टाकण्याच्या मुद्द्यावरून मोठा जनजागृती अभियान सुरू केल्याची घोषणा केली आहे. याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट आव्हान देऊन संदेश दिला की, “तुम्ही मारवाडीला थोबाडीत मारायला सांगितलात तर आम्हीही तसाच बदला घेऊ. कबुतर रक्षक दल तयार करणार; प्रत्येक टॉवर-बिल्डिंगमध्ये जनजागृती निलेशचंद्र म्हणाले, “आजपासून मी प्रत्येक बिल्डिंगमध्ये, प्रत्येक टॉवरमध्ये जाऊन पशु-पक्ष्यांसाठी जनजागृती करणार आहे. जसे प्रत्येक वॉर्डात गौरक्षक आहेत, तसे आता आम्ही ‘कबुतर रक्षक’ तयार करत आहोत. दादरच्या कबूतर खान्याला दोन तास दाणा टाकण्याची परवानगी मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. राज्य व केंद्र सरकारने दोन तास दाणा टाकण्याची परवानगी जाहीर केली आहे, मग दादरला का नाही?” “आम्ही मराठीपेक्षा जास्त मारवाडी भाषेचा सन्मान करतो” ते पुढे म्हणाले, “कबूतर खाणं कशामुळे बंद झालं हे आजही मराठी माणसाला माहित नाही. वोटबँकेच्या राजकारणासाठी मराठी आणि मारवाडी समाजाला भ्रमित केलं जातंय. जेवढा सन्मान तुम्ही मराठी भाषेला करता, त्यापेक्षा जास्त सन्मान आम्ही मारवाडी करतो. प्रत्येक फ्लॅटवर जय महाराष्ट्र, जय जिनेन्द्र असं कायम राहणार. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा फोटो देखील असणार” असं जैन मुन्नी निलेशचंद्र यांनी सांगितलं. “महाराष्ट्र आमची कर्मभूमी, मोठी आई” “राजस्थानहून आलेल्या प्रवासी समाजाशी आमची तुलना करू नका. आमचा जन्म राजस्थानात झाला तरी आमची कर्मभूमी आणि मोठी आई महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राने आम्हाला जेवढं दिलं तेवढंच आम्ही महाराष्ट्राला परत दिलं आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरेंना थेट आव्हान : “आमच्या समाजाशी बोला, नाहीतर…” निलेशचंद्र यांनी राज ठाकरे यांना उद्देशून म्हटलं, “बांगलादेशी आणि फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर तुम्ही मोहिमा काढल्या, भोंग्यांचा प्रश्नही तुम्हीच उचलला. बाळासाहेब ठाकरे नंतर महाराष्ट्र प्रेम कोणी करत असेल तर ते फक्त राज ठाकरे करतात, म्हणून जनता तुमचा सन्मान करते. पण आता आम्हीही संघटित होत आहोत. राज ठाकरे यांनी आमच्या जैन समाजाशी बोलावं. तुम्ही जे सांगाल ते आम्ही ऐकू. पण तुम्ही जर ‘मारवाडीला मारायला सांगा आणि फोटो काढू नका’ असं म्हणालात, तर आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही चालू करा, मग आम्हीही चालू करू. आता आम्ही सहन करणार नाही.” असा इशारा त्यांनी दिला. “भाषावाद फक्त राज ठाकरे संपवू शकतात” शेवटी त्यांनी ठणकावून सांगितलं, “राजस्थानचे जे प्रवासी आहेत त्यांना आता सांगणार – तुम बटोंगे तो पिटोंगे! मोदींनी ‘बटोगे तो कटोगे’ म्हटलं होतं, आम्ही ‘पिटोगे’ करू. मराठी-मारवाडी वाद जर कोणी संपवू शकत असेल तर ते फक्त राज ठाकरे आहेत. इतर कोणत्याही नेत्यात इतकी ताकद नाही.” जैन समाजाच्या या आक्रमक भूमिकेमुळे मुंबईतील भाषिक व सामाजिक वातावरण पुन्हा तणावपूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत.