Suhas Kande | मालेगावमधील ३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी विजय खैरनारच्या कृत्याने महाराष्ट्रभरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. आता या प्रकरणी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी विधान सभेत लक्षवेधी मांडली. मात्र उत्तर देण्यासाठी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर उपस्थित नसल्याने सुहास कांदे आक्रमक झाले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही लक्षवेधी उद्यासाठी राखून ठेवू, असे सांगितले. यावर सुहास कांदे म्हणाले की, “मला गृहमंत्र्यांचे उत्तर पाहिजे आहे. अध्यक्ष महाराज आम्ही काय सातवी नापास नाही. ग्रामीणच्या गृहमंत्र्यांकडून मला उत्तर हवे आहे. मी एका मुलीचा बाप आहे. इथे प्रत्येक जण मुलीचा बाप आहे. आम्हाला मालेगाव प्रकरणी उत्तर हवे,” असे सुहास कांदेंनी ठणकावून सांगितले. काही वेळाने गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर विधानसभेत दाखल झाले. यावेळी लक्षवेधी मांडताना सुहास कांदे म्हणाले की, “येथे बसलेल्या प्रत्येकाला बहीण किंवा मुलगी असेल. तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करायचा तिचा खून करायचा झाडा-झुडपात फेकून द्यायचे आणि ताठ मानेने त्या गावात पोलिसांसोबत फिरायचे. या राज्यात कायद्याची भीती राहिली नाही का? हे कायद्यात बसत नाही. त्या नराधमाला जनतेच्या ताब्यात द्या.” तीन वर्षाच्या मुलीला न्याय मिळू शकेल का? “या प्रकरणात ज्या सरकारी चांगल्या वकिलाला वेळ असेल, तो वकील द्यावा. ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालवणार आहात का? या प्रकरणात जो न्यायाधीश असेल ती महिला न्यायाधीश असेल का? तीन वर्षाच्या मुलीला न्याय मिळू शकेल का? नराधमाला फाशीची शिक्षा होईल का? या केसचा निकाल एक महिन्याच्या आत लागेल का? असे सवाल उपस्थित करत त्यांनी संताप व्यक्त केला. यावर गृहराज्यमंत्री ग्रामीण पंकज भोयर यांनी, आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. हा खटला जलद गतीने न्यायालयात वर्ग करण्याबाबत उच्च न्यायालयात 3 डिसेंबर रोजी विनंती करण्यात आलेली आहे. या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी उपभोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असल्याचे सांगितले. दरम्यान, सत्ताधारी आमदारांनीच आपल्या मंत्र्यांवर संताप व्यक्त केल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले आहे. हेही वाचा: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिका होणार बंद; ईशा केसकरने मागितली चाहत्यांची माफी