हिंगोली (शिवशंकर निरगूडे): औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथे संत सारंगस्वामी महाराज यांच्या ५३१ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या यात्रा महोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या महाप्रसादासाठी तब्बल १५० क्विंटल भाजी आणि १० क्विंटल पोळ्यांचे वाटप १६ जानेवारी रोजी करण्यात आले. राज्यभरासह परराज्यातून आलेल्या हजारो वीरशैव भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. आरोग्याचा महाप्रसाद आणि श्रद्धा वीरशैव समाज बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या संत सारंगस्वामी महाराजांचे सारंगवाडी येथील डोंगरावर संजीवनी समाधी मंदिर आहे. मकर संक्रांतीपासून या यात्रेला सुरुवात होते. येथील भाजीच्या प्रसादाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. ही महाप्रसादाची भाजी खाल्ल्याने वर्षभर कोणताही आजार होत नाही, अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे. यंदाही या प्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे, उज्ज्वला तांभाळे यांच्याकडून सलग काही वर्षांप्रमाणे यंदाही १० क्विंटल पोळ्यांचे वाटप करण्यात आले. १८ हून अधिक भाज्यांचे मिश्रण या महाप्रसादासाठी वांगी, बटाटे, चवळी, टोमॅटो, गाजर, दोडके, मेथी, पालक, चुका, शेपू, हरभरा, करडी, कोबी, हिरवी मिरची, सिमला मिरची, काकडी, मुळा, भोपळा आणि कांद्याची पात अशा १८ हून अधिक भाज्यांचे एकत्रित मिश्रण केले जाते. परिसरातील शेतकरी श्रद्धेने आपल्या शेतातील भाजीपाला दान करतात, तर उर्वरित भाजी कमिटीतर्फे खरेदी केली जाते. प्रशासकीय नियोजन व यात्रा स्वरूप यात्रेनिमित्त डोंगरावर भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आकाश पाळणे, मिठाईची दुकाने आणि खेळण्यांच्या स्टॉल्समुळे परिसर गजबजला होता. भाविकांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केली होती. यात्रेच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमिटी, विश्वस्त मंडळ, शिरड शहापूर, सारंगवाडी व गवलेवाडी येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्रीधर वाघमारे व त्यांच्या पथकाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.