जालना : अंबरनाथ आणि अकोटमधील घडामोडींमुळे भाजप पक्षाचे दुटप्पी धोरण जनतेसमोर उघड झाले आहे. यामुळे हे स्पष्ट होते की ते सत्तेसाठी आपल्या तत्त्वांशी तडजोड करू शकतात. देशाला काँग्रेसमुक्त करण्याच्या प्रयत्नात भाजप स्वतःच काँग्रेसयुक्त झाला आहे, असा टोला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगाविला. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अंबरनाथमधील काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाला न विचारता भाजप-प्रणित आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. काँग्रेसने कठोर कारवाई केली. परंतु भाजपने या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेत स्वागत केले. यावरून भाजपच्या बोलणी आणि करणीतील फरक दिसतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही कारवाई केली नाही आणि केवळ एक विधान केले, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला. भाजप सत्तेसाठी ओवैसींच्या एआयएमआयएमसोबतही हातमिळवणी करण्यास तयार आहे. हे पक्षाच्या नैतिक अधःपतनाचे प्रतिबिंब आहे. सत्ताधारी पक्षाचे अनेक उमेदवार राज्यभरात लोकप्रियतेमुळे नव्हे, तर दबाव, धमक्या आणि पैशांच्या जोरावर बिनविरोध निवडून येत आहेत, असा आरोप त्यांनी केला. तसेच अशा प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासन आणि निवडणूक यंत्रणाही सत्ताधारी पक्षाला मदत करत असल्याचे दिसत आहे. ही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती लोकशाही आणि संविधानासाठी गंभीर धोका असल्याचे त्यांनी म्हटले.