Devendra Fadanvis : वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या पल्स या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील २९०० पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत. पल्स वैद्यकीय परिषदेचे आयोजन करून या परिषदेच्या माध्यमातून वेलनेस उपचारांचा वैद्यकीय पर्यटनातील महाराष्ट्र ब्रँड निर्माण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषद आयोजनाच्या आढावा बैठकीत दिले आहेत. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पारंपरिक खर्चिक असलेल्या वैद्यकीय उपचाराऐवजी वेलनेस उपचारांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. वेलनेस उपचार पद्धतीत राज्यात मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे आयुषमधील उपचार पद्धतींना वेलनेस कडे वळविण्यात यावे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक स्टार्टअप कार्यरत आहेत. अधिकाधिक स्टार्टअपला परिषदेत सहभागी करून घ्यावे. जेणेकरून परिषदेमध्ये या क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन संशोधनावर आधारित चर्चांमधून कर्करोगासारख्या आजारांवर सहज, सोपी आणि परवडणारी उपचार पद्धती विकसित करण्यात स्टार्टअपला मदत होईल. वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी होतील याबाबत दक्षता घ्यावी. त्यांच्या माध्यमातून राज्यात होत असलेल्या बल्क ड्रग पार्कमध्ये गुंतवणूक होईल, यासाठी प्रयत्न करावे. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागांनी नोडल अधिकारी नियुक्त करावेत. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करीत परिषदेच्या आयोजनातून राज्याला वैद्यकीय क्षेत्रात मोठा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी परिषदेत वैद्यक क्षेत्रातील गुंतवणूकदारांसोबत करार करण्यात यावेत. यामधून ग्रामीण भागात आरोग्याच्या दर्जेदार सुविधा निर्माण होतील. मानसिक आजारांवरील नवनवीन उपचार पद्धती, वैद्यकीय पर्यटन विकसित होण्यासाठी परिषदेच्या संधीचा उपयोग करण्यात यावा.