Mumbai News | ठाकरे गटाच्या उमेदवार आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमवारी उच्च न्यायालयात शिवसेनेच्या (शिंदे) प्रवक्त्या सुशी शहा यांनी याचिका दाखल केली आहे. परंतु निवडणुका असल्याने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने कार दिला. यावर निवडणुकीनंतरच सुनावणी होईल, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पेडणेकर यांनी खोटा आणि दिशाभूल करणारा उमेदवारी अर्ज आणि प्रतिज्ञापत्र दाखल करून निवडणूक प्रक्रियेचा गैरवापर केला आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचा दावा शहा यांनी याचिकेत केला आहे. दरम्यान, शहा यांनी पेडणेकर यांच्या उमेदवारी अर्जाला आव्हान दिले आहे. तसेच पेडणेकर यांनी त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती हेतुपुरस्सर दडपल्याचा आरोपही याचिकेत केला आहे. शाह यांनी मुख्य न्या. चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर तातडीच्या सुनावणीसाठी ही याचिका दाखल केली. मात्र, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांना अवघे काही दिवस उरले असल्याचे सांगत न्यायालयाने याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला. याचिकेद्वारे काय केली मागणी? किशोरी पेडणेकर यांनी मध्य मुंबईतील प्रभाग क्रमांक १९९ मधून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला पेडणेकर यांचा नामनिर्देशन अर्ज बेकायदेशीर, अवैध व अयोग्य ठरवून तो फेटाळण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. पेडणेकर यांच्याविरुद्ध अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. तसेच महापौरपदाच्या कार्यकाळात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांची माहिती लपवल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. त्यात करोना काळातील कथित फसवणुकीच्या प्रकरणाचा समावेश असल्याचे याचिकेत म्हटले आहे. हेही वाचा: अमेरिकेकडून आता भारतावर ७५% टॅरिफ? ; इराणशी व्यापार करणाऱ्या देशावर टॅरिफ लादण्याची ट्रम्प यांची घोषणा