Hemant Dhome : शिक्षक-विद्यार्थी नात्याची भावनिक मांडणी, वास्तवाशी जोडलेला आशय आणि मराठी शाळेच्या आठवणी जागवणाऱ्या क्रांतिज्योती विद्यालय -मराठी माध्यम चित्रपटाने घवघवीत यश मिळवत तब्बल २५ कोटींचा विक्रमी टप्पा पार केला आहे. खरंच ही मराठी चित्रपटासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. नुकताच या भरीव यशानिमित्त चित्रपटाच्या टीमकडून भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार व तांत्रिक टीमसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली. याच समारंभात चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा करण्यात आली आहे. क्रांतिज्योती विद्यालय -मराठी माध्यम चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “क्रांतीज्योती हा चित्रपट प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. २५ कोटी रुपयांचा टप्पा गाठणं ही संपूर्ण टीमची मेहनत आणि प्रेक्षकांच्या प्रेमाची पावती आहे. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याचे मनापासून आभार मानतो. तसंच रसिक प्रेक्षकांचे ऋण शब्दांत मांडता येणार नाही. याच प्रेमामुळे आम्हाला अधिक प्रामाणिक, आशयघन चित्रपट घेऊन येण्याची ऊर्जा मिळते.” अशा शब्दांत हेमंत ढोमेने आपल्या भावना व्यक्त केल्या. याशिवाय सुपरहिट ‘झिम्मा’ फ्रँचायझीचा पुढचा भाग ‘झिम्मा ३’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच भेटीला येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे हे दोन्ही चित्रपट पुन्हा एकदा दमदार आणि आशयपूर्ण कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हेही वाचा : Gadchiroli Naxal Encounter : पोलीस नक्षल चकमकीत सी-६० जवान दीपक मडावी यांना वीरमरण ; ३ नक्षलवाद्यांना कंठस्नान