Tamannah Bhatia: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपलं स्थान पक्कं करणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनयासोबतच आपल्या दमदार डान्स परफॉर्मन्समुळे तमन्ना कायमच चर्चेत असते. यावेळी तिच्या नृत्यामुळे नाही, तर तिने घेतलेल्या मानधनामुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य कॉन्सर्टमध्ये तमन्ना भाटियाने अवघ्या ६ मिनिटांच्या डान्स परफॉर्मन्ससाठी तब्बल ६ कोटी रुपये मानधन घेतलं आहे. त्यामुळे तिने एक नवा विक्रम प्रस्थापित केल्याचं बोललं जात आहे. हा न्यू इयर सेलिब्रेशनचा कार्यक्रम ३१ डिसेंबर २०२५ रोजी गोव्यातील बागा बीचवरील प्रसिद्ध ‘लास ओलास बीच क्लब’ येथे पार पडला. या कार्यक्रमात तमन्नाने पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवासोबत स्टेज शेअर केला. ‘स्त्री २’मधील ‘आज की रात’, ‘जेलर’मधील ‘कावाला’ यांसारख्या हिट गाण्यांवर तिच्या नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून चाहत्यांनी तिच्या एनर्जीचं भरभरून कौतुक केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कॉन्सर्टमध्ये ६ मिनिटांच्या डान्ससाठी तमन्नाला ६ कोटी रुपये देण्यात आले, म्हणजेच एका मिनिटासाठी १ कोटी रुपये. मात्र, ही माहिती अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेली नाही. या कार्यक्रमात तमन्नासोबतच गायक मिलिंद गाबा तसेच DJs चेत्ज, स्वप्निल आणि मॅक व्हिएरा यांनीही लाईव्ह परफॉर्मन्स दिला. त्यामुळे हा कार्यक्रम गोव्यातील सर्वात मोठ्या बीचफ्रंट न्यू इयर पार्टींपैकी एक ठरला. गेल्या काही वर्षांत तमन्ना भाटियाने अनेक सुपरहिट आयटम साँग्समधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे तिला चाहत्यांकडून “आयटम साँग क्वीन” असंही म्हटलं जातं. सोशल मीडियावर अनेकांनी म्हटलं आहे की, तिच्या डान्सची लोकप्रियता पाहता एवढं मानधन मिळणं आश्चर्यकारक नाही. कामाच्या आघाडीवर पाहिलं तर तमन्ना नुकतीच तमिळ चित्रपट ‘अरनमनई ४’ मध्ये झळकली होती. सध्या ती आपल्या आगामी बॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असून तिच्याकडे तीन हिंदी चित्रपट आणि काही विशेष डान्स नंबरचे ऑफर्स असल्याचं सांगितलं जात आहे.