Shefali Shah : अभिनेत्री शेफाली शाह सध्या तिच्या अभिनयामुळे यशाच्या शिखरावर आहे. मात्र वैयक्तिक आयुष्यात तिला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शेफालीने तिच्या पहिल्या लग्नातील त्रासदायक अनुभवांबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. शेफाली शाहने अभिनेता हर्ष छाया यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र काही वर्षांतच हे नातं तुटलं आणि दोघांचा घटस्फोट झाला. या नात्यात आपण भावनिक छळ (इमोशनल एब्यूज) सहन केला, असा धक्कादायक खुलासा शेफालीने केला आहे. “तू स्वतः पुरेशी आहेस, हे कोणी सांगितलंच नाही” एका मुलाखतीत शेफाली म्हणाली, “मला कधीच कोणी सांगितलं नाही की तू स्वतः पुरेशी आहेस. पूर्ण होण्यासाठी तुला नवरा, मित्र किंवा कुणाची गरज नाही. नातं चांगलं असेल तर ठीक आहे, पण वाईट नातं तुमची किंमत कमी करत.” ती पुढे म्हणाली की सततच्या मानसिक तणावामुळे एक वेळ अशी येते की माणूस पूर्णपणे तुटतो. “एक क्षण असा येतो, जेव्हा वाटतं हे आता माझा जीव घेईल. मी आता हे सहन करू शकत नाही.” आनंद नसलेल्या नात्यात राहणं शक्य नाही पहिलं लग्न तोडण्याचा निर्णय कसा घेतला, याबद्दल शेफालीने सांगितलं की एका मैत्रिणीशी झालेल्या संवादानंतर तिच्या विचारांना स्पष्टता आली. “जर आयुष्यभर एकट राहावं लागलं तरी चालेल, पण जिथे आनंद नाही, आत्मविश्वास नाही आणि आपुलकी नाही अशा नात्यात मी राहू शकत नाही,” असं तिने ठामपणे सांगितलं. भावनिक छळ किती घातक असतो शेफालीने इमोशनल एब्यूजबद्दलही महत्त्वाचं भाष्य केलं. “लोक विचारतात, ‘त्याने मारलं का?’ मारलं नाही म्हणजे सगळं ठीक आहे, असं समजलं जातं. पण ओरडणं, अपमान करणं, ‘तू मूर्ख आहेस’ असं बोलणं हेही तितकंच घातक असतं. हे हळूहळू माणसाला आतून मोडून टाकतं,” असं ती म्हणाली. लग्न, घटस्फोट आणि पुढचं आयुष्य शेफाली शाह आणि हर्ष छाया यांचं लग्न १९९४ मध्ये झालं होतं. दोघे ‘हसरतें’ या लोकप्रिय मालिकेत एकत्र झळकले होते. मात्र २००० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर शेफालीने दिग्दर्शक-निर्माता विपुल शाह यांच्याशी विवाह केला. तर हर्ष छायाने बंगाली अभिनेत्री सुनीता गुप्ता यांच्याशी लग्न केलं. शेफाली शाहचा हा अनुभव आजही अनेक महिलांसाठी आवाज देणारा आणि प्रेरणादायी ठरत आहे.