Shatrughan Sinha : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबाल यांच्या लग्नानंतर या नात्याबाबत अनेक चर्चा झाल्या. २३ जून २०२४ रोजी दोघांनी कुटुंबीय आणि इंडस्ट्रीतील जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं. इंटरफेथ मॅरेजमुळे त्यांना सोशल मीडियावर टीकेलाही सामोरं जावं लागलं. अशा वेळी सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा सुरुवातीपासूनच मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. शत्रुघ्न सिन्हा हे नेहमीच मुलांच्या आनंदाला प्राधान्य देणारे वडील म्हणून ओळखले जातात. मुलीच्या लग्नानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की सोनाक्षीने काहीही चुकीचं केलेलं नाही. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांना सोनाक्षी आणि जहीर यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आमचं नातं खूप छान आहे. जहीर आणि सोनाक्षी एकमेकांचा खूप आदर करतात. ते असे वाटतात जणू एकमेकांसाठीच बनले आहेत. फारच छान जोडी आहे.” ते पुढे म्हणाले की सोनाक्षीने जर असं म्हटलं असेल की हा माणूस तिच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे, तर ती असंही म्हणते की तिच्या आयुष्यात फक्त दोनच हिरो आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर काही युजर्सनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्याही. सोनाक्षीनेही ट्रोल्सना दिलं उत्तर सात वर्षांच्या डेटिंगनंतर सोनाक्षी आणि जहीरने २३ जून २०२४ रोजी लग्न केलं. मुस्लिम अभिनेत्याशी लग्न केल्यामुळे सोनाक्षीला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं. अलीकडेच सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये सोनाक्षीने या टीकेवर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “हा फक्त गोंगाट होता. मी हे करणारी ना पहिली आहे ना शेवटची. मी एक समजूतदार स्त्री आहे आणि माझ्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेते. आम्हाला हे सगळं अगदी निरर्थक वाटत होतं. तो आमच्यासाठी खूप सुंदर क्षण होता, म्हणून आम्ही स्वतःला या गोंगाटापासून दूर ठेवलं.” “मी नाही राहिलो तर माझ्या मुलीच्या बाजूने कोण उभं राहील?” याआधी दिलेल्या एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते, “हे लग्न कायदेशीर आहे. मुलांनी आपल्या इच्छेने आणि आमच्या आशीर्वादाने लग्न केलं आहे. त्यामुळे मी त्यांना पूर्ण पाठिंबा देतो.” ते पुढे म्हणाले, “जर मीच माझ्या मुलीच्या बाजूने उभा राहिलो नाही, तर तिच्यासाठी कोण उभं राहील?” शत्रुघ्न सिन्हा यांच्या या वक्तव्यांमधून मुलीसाठी असलेलं त्यांचं प्रेम आणि पाठिंबा स्पष्टपणे दिसून येतो.