Rani Mukerji: अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘मर्दानी 3’ मुळे चर्चेत आहे. 30 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. दरम्यान, एका मुलाखतीत राणीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि विशेषतः पालकत्वाच्या अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलली आहे. जेन अल्फा मुलीची परवरिश कठीण एका मुलाखतीत राणी म्हणाली, “आजची नवी पिढी म्हणजे जेन अल्फा. अशा मुलीचा सांभाळ करताना थोडी भीती वाटते. मी काहीही बोलले तरी माझी मुलगी अदिरा गप्प बसणार नाही, ती मला उत्तर देईल. आणि ते मला ऐकून घ्यावं लागेल.” ती पुढे म्हणाली, “आमच्या लहानपणी आम्ही आईला उलट उत्तर दिलं असतं, तर लगेच मार बसला असता. पण मी माझ्या मुलीला मारू शकत नाही. उलट तीच मला मारू शकते,” असं म्हणत राणीने हसत-हसत आपली भावना व्यक्त केली. राष्ट्रीय पुरस्कारावेळी अदिराचा आनंद राणीने एक किस्साही सांगितला. “राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर अदिरा घरात खूप आनंदाने नाचत होती. ते दृश्य मला फार गोड वाटलं. पण तरीही मला तिची थोडी भीती वाटते, कारण ती जेन अल्फा किड आहे,” असं राणी म्हणाली. अदिराला आईचे सगळे चित्रपट आवडत नाहीत राणीने हेही सांगितलं की तिची मुलगी आईचे सगळे चित्रपट पाहत नाही. “मला पडद्यावर रडताना ती पाहू शकत नाही. मी स्क्रीनवर आनंदी असलेले चित्रपट तिला आवडतात. ‘हिचकी’, ‘थोडा प्यार थोडा मॅजिक’, ‘बंटी और बबली’ हे चित्रपट तिला आवडतात. पण ‘कुछ कुछ होता है’ ती पाहत नाही, कारण त्यात माझा मृत्यू लवकर होतो,” असं राणी म्हणाली. मेकअपबाबतही अदिरा खूप स्पष्ट आहे. “मी मेकअपमध्ये असताना ती म्हणते तुम्ही माझ्या आईसारख्या दिसत नाही. मेकअप काढल्यावरच ती म्हणते आता तुम्ही माझ्या आईसारख्या दिसता,” असंही राणीने सांगितलं. 2014 मध्ये झाले लग्न राणी मुखर्जीने 2014 मध्ये चित्रपट दिग्दर्शक आदित्य चोपडा यांच्याशी लग्न केलं. 2015 मध्ये त्यांच्या मुलीचा, अदिराचा जन्म झाला. राणी आणि आदित्य दोघेही आपलं खासगी आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवणंच पसंत करतात. राणीचा हा अनुभव आजच्या पालकांना नक्कीच आपलासा वाटणारा आहे.