Rani Mukerji: अभिनेत्री राणी मुखर्जी हिने महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणि समाजातील वास्तवावर स्पष्ट मत मांडले आहे. ‘मर्दानी 3’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या खास मुलाखतीत तिने सांगितले की, निर्भया प्रकरणानंतर निर्माण झालेला संताप आणि अस्वस्थता आजही तशीच आहे, कारण असे प्रकार अजूनही रोज घडत आहेत. राणी म्हणाली, “निर्भया हा फक्त एकच प्रकार नव्हता. असे अनेक प्रकार रोज आपल्या आजूबाजूला होत असतात, पण त्यातील बरेचसे समोर येतच नाहीत. काही दिवस आपण भावूक होतो, चर्चा होते, पण नंतर सगळं शांत होतं. हेच मला सर्वात जास्त भीतीदायक वाटतं.” ‘मर्दानी’ची सुरुवात आणि हेतू २०१४ साली प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘मर्दानी’ या चित्रपटातून राणीने शिवानी शिवाजी रॉय ही कणखर महिला पोलीस अधिकारी साकारली. या चित्रपटाने महिला पोलिसांची ताकद आणि वास्तववादी संघर्ष दाखवला. पुढे ‘मर्दानी 2’ आणि आता लवकरच ‘मर्दानी 3’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “हा चित्रपट कुणाला घाबरवण्यासाठी नाही, तर विचार करायला भाग पाडण्यासाठी आहे,” असे राणीने स्पष्ट केले. अशा चित्रपटांची गरज का आहे? राणीच्या मते, समाजातील अस्वस्थ करणाऱ्या वास्तवाकडे डोळे झाकून चालणार नाही. “आपण अशा बातम्या किंवा चित्रपट पाहायचे नाहीत असे म्हणतो, पण त्यामुळे सत्य बदलत नाही. प्रश्न विचारले नाहीत, तर बदल कसा होणार?” असे ती म्हणाली. आई म्हणून भीती अधिक वाढते स्वतः एक आई असल्याने हा विषय अधिक जवळचा वाटतो, असे राणीने सांगितले. “आई झाल्यावर विचार, संवेदना आणि भीती सगळं बदलतं. आज प्रत्येक स्त्री कुठल्या ना कुठल्या भूमिकेत संघर्ष करत आहे. ती भीती आत कुठेतरी कायम असतो,” असे ती म्हणाली. महिलांना बळ देणाऱ्या भूमिका राणीने सांगितले की, तिला वेगवेगळ्या रूपातील मजबूत भारतीय महिला साकारायला आवडतात. कधी पत्रकार, कधी गृहिणी, तर कधी पोलीस अधिकारी. “भारतीय महिला खूप मजबूत आहेत आणि ही ताकद सिनेमातून दिसायला हवी,” असे तिचे मत आहे. शेवटी राणी म्हणाली की, प्रेक्षकांचा पाठिंबा मिळत राहिला, तर अशा आशयपूर्ण आणि समाजाला विचार करायला लावणाऱ्या कथा ती पुढेही सांगत राहील.