Rani Mukerji: बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यंदा चित्रपटसृष्टीत आपले ३० वर्ष पूर्ण करत आहे. सध्या ती आपल्या आगामी चित्रपट ‘मर्दानी 3’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान राणीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि करिअरच्या सुरुवातीबाबत एक भावूक खुलासा केला आहे. यशराज स्टुडिओमध्ये दिग्दर्शक करण जोहरसोबत संवाद साधताना राणीने सांगितलं की, तिचे आई-वडील तिला खूप कमी वयात लग्न लावून द्यायच्या विचारात होते. घरच्यांना राणीने काम करावं असं वाटत नव्हतं राणीने सांगितलं की, जरी ती फिल्मी कुटुंबातून आली असली तरी तिच्या घरात परिस्थिती फारशी चांगली नव्हती. तिचे वडील राम मुखर्जी चित्रपट निर्माता होते, मात्र घरखर्च कसाबसा भागत होता. “माझ्या आई-वडिलांनी कधीच असा विचार केला नव्हता की मी चित्रपटात काम करेन. घराची जबाबदारी मुलांवरच असते, अशीच त्या काळी धारणा होती. त्यामुळे माझ्या बाबतीत लग्न हा एकमेव पर्याय मानला जात होता,” असं राणीने स्पष्ट केलं. Rani Mukerji आईमुळे मिळाली पहिली फिल्म राणीने सांगितलं की, वडिलांचे मित्र सलीम अख्तर यांनी तिला ‘राजा की आएगी बारात’ या चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यावेळी तिच्या आईनेच तिला हा चित्रपट स्वीकारण्याचा सल्ला दिला. “त्या वेळी मला कळलंच नव्हतं, पण माझी आई कदाचित घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा विचार करत होती. आज मागे वळून पाहताना ते सगळं लक्षात येतं,” असं राणी म्हणाली. 1996 मध्ये केला होता डेब्यू राणी मुखर्जीने (Rani Mukerji ) 1996 साली ‘राजा की आएगी बारात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही, पण राणीची ओळख निर्माण झाली. त्यानंतर ‘गुलाम’, ‘कुछ कुछ होता है’ यांसारख्या चित्रपटांनी तिला वेगळी ओळख दिली. यंदा राणी ‘मर्दानी 3’च्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.