Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटे सध्या तिच्या ‘रात अकेली है : द बंसल मर्डर्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान याच्यासोबतचा एक मजेशीर आणि अविस्मरणीय अनुभव शेअर केला आहे. शाहरुखने आपल्याला अचानक फोन केला होता, मात्र सुरुवातीला तो कुणाचा तरी प्रँक कॉल असल्याचं वाटल्याचं राधिकाने सांगितलं. राधिका आपटेने सांगितलं की एकदा ती जेवण करत असताना तिला एका अनोळखी नंबरवरून मिस्ड कॉल आला. थोड्याच वेळात त्याच नंबरवरून एक मेसेज आला, ज्यात “राधिका, मी शाहरुख खान बोलतोय. कृपया मला फोन करा,” असं लिहिलं होतं. हा मेसेज पाहून राधिकाला क्षणभर विश्वासच बसला नाही आणि कुणीतरी मजा करत असल्याचं तिला वाटलं. तिने लगेचच हा नंबर आपल्या एजंटकडून तपासून घेतला. तपासणी केल्यानंतर हा नंबर खरोखरच शाहरुख खानचाच असल्याचं समजताच राधिकाने त्यांना फोन केला. फोनवर शाहरुख खान यांनी राधिकाला सांगितलं की त्यांनी तिचा ‘अंधाधुन’ चित्रपट पाहिला असून तिचं अभिनय त्यांना खूप आवडलं. केवळ तिच्या कामाचं कौतुक करण्यासाठीच आपण फोन केल्याचं त्यांनी सांगितलं. याच मुलाखतीत राधिकाने शाहरुख खानसोबत झालेल्या पहिल्या भेटीबद्दलही सांगितलं. एकदा पहाटे पाच वाजता झालेल्या एका पार्टीत शाहरुख खान तिला भेटले. त्यांनी स्वतःहून राधिकाला शोधून काढलं आणि जवळजवळ अर्धा तास तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. शाहरुख खान अत्यंत नम्र आणि आपुलकीने वागणारे असल्याचं राधिकाने आवर्जून नमूद केलं. दरम्यान, राधिका आपटे अलीकडेच ‘साली मोहब्बत’मध्ये झळकली होती आणि लवकरच ती ‘रात अकेली है : द बंसल मर्डर्स’मध्येही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.