Raashi Khanna: हिंदी चित्रपट ‘मद्रास कॅफे’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी राशि खन्ना आज पॅन इंडिया अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेल्या दहा वर्षांत तिने केवळ हिंदीच नव्हे, तर तमिळ आणि तेलुगू सिनेसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2025 मध्ये तिचे तीन चित्रपट प्रदर्शित आले असून, आणखी चार चित्रपट येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत. दिल्ली, मुंबई आणि हैदराबादने घडवलं मला राशि सांगते की ती दिल्लीमध्ये वाढली, मुंबईत करिअरची सुरुवात केली आणि आता हैदराबादमध्ये स्थायिक झाली आहे. “कधी-कधी मला वाटतं मी नेमकी कोण आहे, कारण वेगवेगळ्या भाषांमधील आणि प्रदेशांतील भूमिका करताना मी त्या पात्रातच रमून जाते,” असं ती हसत सांगते. हैदराबाद आता तिचं घर झालं आहे. दिल्ली आणि मुंबईत ती सतत ये-जा करत असते. ती स्वतःला फूडी मानते आणि म्हणते, “दिल्लीच्या खाण्याला तोड नाही. गोलगप्पे, टिक्की आजही खूप आठवतात.” मुंबईबद्दल बोलताना ती म्हणते की, तिथली सुरक्षितता खूप आवडते. “रात्री उशिराही ऑटोने फिरता येतं. मी आजही कधी कधी ऑटोने फिरते, जरी माझा मॅनेजर नकार देत असला तरी,” असं ती सांगते. साउथ सिनेमाकडे वळण्यामागचं कारण ‘मद्रास कॅफे’नंतर हिंदीतच काम करण्याचा विचार होता का, यावर राशि म्हणते की तिला कधीच स्टार बनायचं होतं असं वाटलं नव्हतं. “मला अभिनयाची फार आवडही नव्हती. सेटवर काम करायला आवडलं म्हणून मी पुढे काम करत गेले. ‘मद्रास कॅफे’नंतर चांगलं काम मिळालं नसत, तर मी काहीतरी वेगळं केलं असतं,” असं ती स्पष्टपणे सांगते. पहिली तेलुगू फिल्म मिळाली आणि तिथूनच तिचा प्रवास पुढे सुरू झाला. आउटसाइडर म्हणून संघर्ष फिल्मी पार्श्वभूमी नसताना इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण होतं का, यावर राशि म्हणते, “इंडस्ट्रीतले असाल तरीही काम कायम मिळेल याची खात्री नसते. बाहेरून आलेल्या कलाकारांना जास्त मेहनत घ्यावी लागते, हे खरं आहे. पण मी कधीही स्वतःला विक्टिम मानलं नाही. रिजेक्शन आलं तरी ते या व्यवसायाचा भाग आहे, असं समजून घेतलं.” खाण्याची आवड, पण शिस्त महत्त्वाची राशिला खाण्याची खूप आवड आहे. मात्र, अभिनेत्री झाल्यानंतर आहारात बदल करावे लागले. “मी स्वतःला उपाशी ठेवत नाही. क्रॅश डायटवर माझा अजिबात विश्वास नाही. हेल्दी खाल्लं तर सगळं बॅलन्स राहतं,” असं ती सांगते. मिठाई आणि समोसे तिला फार आवडतात, पण आता ती त्यावर नियंत्रण ठेवते. इंडस्ट्रीत आजही हिरोची पूजा इंडस्ट्रीतील असमानतेबद्दल बोलताना राशि म्हणते, “आपला समाजच पितृसत्ताक आहे. त्यामुळे इंडस्ट्रीतही हिरोला जास्त महत्त्व दिलं जातं. पण आता परिस्थिती बदलतेय, कारण मुली बोलू लागल्या आहेत. पूर्ण बदल होण्यासाठी वेळ लागेल, पण बदल नक्की होईल,” असा विश्वास तिने व्यक्त केला.