Priyanka Chopra : ८३व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२६साठी प्रेझेंटर्सची यादी जाहीर झाली असून, त्यात भारतीय ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा जोनासचं नाव समाविष्ट आहे. ही भारतीय चाहत्यांसाठी अभिमानाची बाब आहे, कारण प्रियंका पुन्हा एकदा या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. प्रियंका चोप्रा हॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री जूलिया रॉबर्ट्स, अभिनेता जॉर्ज क्लूनी आणि मिला कुनिस यांच्यासोबत स्टेजवर अवॉर्ड्स सादर करणार आहे. बराच काळानंतर प्रियंका या भव्य सोहळ्यात दिसणार असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. स्टार्सनी सजलेली प्रेझेंटर्सची यादी गोल्डन ग्लोब्सच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर यंदाच्या प्रेझेंटर्सची यादी शेअर करण्यात आली आहे. या यादीत अनेक मोठ्या हॉलीवूड स्टार्सचा समावेश आहे. प्रमुख नावांमध्ये प्रियंका चोप्रा जोनास, जूलिया रॉबर्ट्स, जॉर्ज क्लूनी, मिला कुनिस यांचा समावेश आहे. याशिवाय आयो एडेबिरी, क्रिस पाइन, डकोटा फॅनिंग, हेली स्टेनफेल्ड, अमांडा सेफ्राइड, मेलिसा मॅकार्थी, मायली सायरस, ऑर्लॅंडो ब्लूम, स्नूप डॉग, क्वीन लतीफा, जॉन बेटमन यांसारखे अनेक कलाकार अवॉर्ड्स सादर करणार आहेत. होस्टिंगची जबाबदारी पुन्हा निक्की ग्लेझरकडे या वर्षीच्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सची होस्टिंग प्रसिद्ध कॉमेडियन निक्की ग्लेझर करणार आहेत. मागील वर्षी त्यांच्या होस्टिंगला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या कार्यक्रमाचं प्रोडक्शन डिक क्लार्क प्रोडक्शन्सकडून केलं जाणार आहे. कधी आणि कुठे पाहता येईल अवॉर्ड शो? गोल्डन ग्लोब्स हा चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील एक महत्त्वाचा पुरस्कार सोहळा आहे. हा कार्यक्रम रविवारी संध्याकाळी ५ वाजता (स्थानिक वेळेनुसार) सुरू होईल. भारतीय वेळेनुसार हा सोहळा सोमवार सकाळी ६.३० वाजता पाहता येईल. अमेरिकेत हा शो सीबीएस चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल आणि पॅरामाउंट प्लसवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल. आंतरराष्ट्रीय मंचावर प्रियंकाचा अनुभव प्रियंका चोप्रासाठी हा पहिलाच आंतरराष्ट्रीय अनुभव नाही. याआधी तिने अनेक ग्लोबल अवॉर्ड शोजमध्ये सहभाग घेतला आहे. २०१३ मध्ये तिने शाहरुख खानसोबत फिल्मफेअर अवॉर्ड्सचं होस्टिंग केलं होतं. याशिवाय ऑस्करसोहळ्यासह अनेक जागतिक कार्यक्रमांमध्ये ती प्रेझेंटर आणि होस्ट म्हणून झळकली आहे. एकूणच, पुन्हा एकदा गोल्डन ग्लोब्सच्या मंचावर प्रियंका चोप्रा झळकणार असल्यामुळे भारतासाठी हा खास आणि अभिमानाचा क्षण ठरणार आहे.