Neha Pendse: मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) सध्या ‘तिघी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सोनाली कुलकर्णी आणि भारती आचरेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र चित्रपटाइतकेच तिचे मातृत्वाबद्दलचे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. नेहाने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत लग्न, वैयक्तिक आयुष्य आणि आई होण्याच्या निर्णयाबद्दल स्पष्टपणे मत मांडले. “लग्नानंतर माझ्यात खूप बदल झाले,” असे ती म्हणाली. लग्नाआधी ती खूप स्वतंत्र होती. निर्णय घेताना फारसा विचार करावा लागत नव्हता. आई-वडील कायम पाठिशी असायचे. पण लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात आणि प्रत्येक गोष्ट समजून-उमजून करावी लागते, असे तिने सांगितले. Neha Pendse नेहा म्हणाली की तिच्या नवऱ्याचा स्वभाव खूप चांगला आहे. मात्र त्याला मनोरंजन क्षेत्राबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे आऊटडोअर शूटिंग, प्रमोशन किंवा अनियमित वेळा याबद्दल त्याला समजावून सांगावे लागते. “लग्न टिकवण्यासाठी दोघांनीही बदल करणे गरजेचे असते. जसे मी बदल केले, तसेच त्यानेही केले,” असे ती म्हणाली. Neha Pendse लग्न उशिरा करणे योग्य का, या प्रश्नावर नेहाने सांगितले की हा निर्णय प्रत्येकासाठी वेगळा असतो. “मी लहानपणापासून काम करत होते. माझी महत्त्वाकांक्षा मोठी होती. त्यामुळे उशिरा लग्न करणं मला योग्य वाटलं. पण हे सगळ्यांवर लागू होत नाही,” असे ती स्पष्टपणे म्हणाली. काही मुलींना मातृत्वातच आयुष्याचा अर्थ सापडतो, तर काहींना करिअर महत्त्वाचे वाटते. प्रत्येकाने स्वतःला काय हवे आहे हे ओळखून निर्णय घ्यावा, असा तिचा सल्ला आहे. आई होण्याबद्दल विचारले असता नेहाने थेट “नाही” असे उत्तर दिले. ती म्हणाली, “मी माझे बीजांड गोठवून ठेवले आहेत. लग्नानंतर एका टप्प्यावर मला आई व्हायचं होतं. पण तेव्हा काही कारणांमुळे मी आई होऊ शकले नाही. त्या प्रक्रियेत मी इतकी निराश झाले की मला वाटलं, आता मला आई व्हायचं नाही.” ती पुढे म्हणाली, “कदाचित त्या वेळी माझ्या मनात रागही होता. म्हणून मी भविष्यासाठी पर्याय ठेवला. पण आत्ता तरी मला आई व्हायचं नाही असं वाटतं. मला ती जबाबदारी घ्यायची नाही.” नेहा पेंडसेच्या या स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिकेमुळे अनेक महिलांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. समाजाने ठरवलेल्या चौकटीत न अडकता स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घेण्याचा तिचा संदेश अनेकांना भावतो आहे. मातृत्व हा प्रत्येक स्त्रीचा वैयक्तिक निर्णय असतो आणि तो आदराने स्वीकारला गेला पाहिजे, हे तिच्या वक्तव्यातून ठळकपणे समोर आले आहे.