Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या आगामी ‘दो दिवाने शहर में’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका खास मुलाखतीत तिने प्रेम, लग्न आणि आयुष्याच्या जोडीदाराबद्दल मनमोकळेपणाने बोललं आहे. मृणाल म्हणते, “मला एखादा चांगला माणूस मिळाला, ज्याच्याशी माझं मन जुळेल आणि ज्याच्यासोबत सगळं सोपं वाटेल, तर मी नक्कीच झटपट लग्न करेन. मी लाल जोडा घालून नवरी होण्यासाठी तयार आहे.” तिने हेही सांगितलं की तिचे आई-वडीलही आता नातवंडांसाठी तयार आहेत. शाळेपासून प्रेमाची स्वप्नं आपल्या शालेय आठवणी सांगताना मृणाल म्हणाली की दुसरी ते सातवीत असताना तिला एका मुलावर खूप क्रश होता. पण ती खूप लाजाळू असल्यामुळे तिने कधीच आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत. नंतर वडिलांची बदली झाल्यामुळे तो किस्सा अपुरा राहिला. त्यानंतर तिचे क्रश थेट फिल्मी हिरोंवर गेले. ऋतिक, शाहिद आणि जॉनची होती क्रेझ मृणालने हसत सांगितलं की लहानपणी तिला ऋतिक रोशन, शाहिद कपूर आणि जॉन अब्राहम यांचं प्रचंड वेड होतं. त्यांच्या फोटोचे कटआउट्स ती पुस्तकांत लपवून ठेवायची. विशेष म्हणजे पुढे जाऊन तिला या तिन्ही अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली, ही बाब तिच्यासाठी स्वप्नपूर्तीच होती. Mrunal Thakur लग्नाबद्दलचा विचार बदलला लग्नाबद्दल बोलताना मृणाल म्हणाली, “पूर्वी मला वाटायचं आधी करिअर सेटल झालं पाहिजे, मग लग्न. पण आता मला कळलंय की लग्न योग्य वेळी होणं गरजेचं असतं.” तिने स्पष्ट केलं की ती केवळ दबावामुळे लग्न करणार नाही, तर मनापासून तयार झाल्यावरच हा निर्णय घेईल. कसा हवा जीवनसाथी? मृणाल म्हणते, “मला असा जोडीदार हवा जो भयंकर भांडणानंतरही मला मिठी मारेल. मी जशी आहे तशी मला स्वीकारेल.” तिच्या मते, नात्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना समजून घेणं, स्वीकारणं आणि एकत्र वाढणं. शेवटी ती म्हणते, “लग्न हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. सिंदूर, मंगळसूत्र, लाल बांगड्या… सगळं मला हवंय. फक्त योग्य माणूस भेटायला हवा.”