Mithila Palkar: ‘त्रिभंगा’, ‘कारवां’ आणि ‘चॉपस्टिक’सारख्या चित्रपटांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मिथिला पालकर आता एका मोठ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आमिर खानच्या प्रोडक्शनमधील ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ या चित्रपटात मिथिला महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने या चित्रपटातील अनुभव शेअर केला. करिअरमधली पहिली कॉमेडी मिथिला म्हणाली की, हा तिच्या करिअरमधील पहिला कॉमेडी चित्रपट आहे. “हा सिनेमा करण्यासाठी ‘नाही’ म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्यासाठी ही एक मोठी संधी आहे,” असं तिने सांगितलं. आमिर खानसारख्या दिग्गज कलाकाराच्या प्रोडक्शनमध्ये काम करणं ही आपल्या आयुष्यातली मोठी उपलब्धी असल्याचंही तिने नमूद केलं. ‘रूपा’चं बोल्ड आणि बिनधास्त पात्र या चित्रपटात मिथिला ‘रूपा’ नावाच्या एका बोल्ड आणि बिनधास्त मुलीची भूमिका साकारत आहे. हे पात्र तिच्यासाठी आव्हानात्मक ठरलं. ती म्हणाली, “या चित्रपटात माझं बोलणं, चालणं, वागणं सगळंच वेगळं आहे. मला स्वतःला एका नव्या दृष्टिकोनातून तपासण्याची संधी मिळाली.” कॉमेडी हा नवा प्रकार असल्यामुळे शूटिंगदरम्यान अडचणी आल्याचंही तिने सांगितलं. विशेषतः अपशब्द असलेले संवाद बोलणं तिच्यासाठी कठीण होतं. वीर दासला थप्पड मारण्याचा सीन सर्वात अवघड मिथिलाच्या मते, संपूर्ण चित्रपटात सर्वात कठीण सीन वीर दासला थप्पड मारण्याचा होता. ती म्हणाली, “रूपा या पात्रात अपराधबोध नाही. त्यामुळे वीरला थप्पड मारताना गिल्ट न दाखवणं आणि त्याच वेळी कॉमेडी एक्सप्रेशन ठेवणं खूप अवघड होतं.” मात्र, वीर दासने सेटवर तिला खूप मदत केल्याचंही मिथिलाने सांगितलं. “तुमच्या डायलॉग्ससोबत खेळा, कॉमेडी आपोआप येईल,” असा सल्ला वीरने दिला होता. १६ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित आमिर खान प्रोडक्शनमधील ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ या चित्रपटाचा ट्रेलर आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट १६ जानेवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.