Malaika Arora : बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा वयाच्या ५१ व्या वर्षीही तितकीच तंदुरुस्त आणि एनर्जेटिक दिसते. सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या तिच्या फोटो,व्हिडिओंमुळे तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असते. अनेकांना प्रश्न पडतो की, एवढ्या वयातही मलायका इतकी फिट कशी राहते? याच प्रश्नाचं उत्तर तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलं आहे. मलायका अरोराने एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आहाराबद्दल आणि दिनक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. ती म्हणाली की, ती खाण्यापूर्वी अन्नाचं वजन मोजत नाही. मात्र, ठराविक आकाराच्या वाटीतच जेवण घेते. “ती वाटीच माझा माप आहे. त्यापेक्षा जास्त मी खात नाही,” असं तिने सांगितलं. तिने इंटरमिटंट फास्टिंगबद्दलही भाष्य केलं. मलायका सांगते की, ती १७ तास उपवास करते आणि उरलेल्या ७ तासांतच अन्न घेते. यामुळे तिची झोप सुधारली आहे, शरीर हलकं वाटतं आणि दिवसाची सुरुवात ताजेतवाने होते. आधी ती ही पद्धत रोज अवलंबायची, पण आता ती एक दिवसाआड इंटरमिटंट फास्टिंग करते. मलायका पुढे म्हणाली की, तिला ‘चीट डे’ या संकल्पनेवर विश्वास नाही. “मला जे खायचं आहे ते मी खाते, पण ठराविक वेळेतच. वेळ संपल्यानंतर मी काहीही खात नाही,” असं तिने स्पष्ट केलं. संध्याकाळी सात वाजल्यानंतर ती जेवत नाही. सूर्यास्तानंतर खाणं टाळण्याचा ती कटाक्षाने प्रयत्न करते. सकाळच्या दिनक्रमाबद्दल बोलताना मलायका म्हणाली की, ती लवकर उठते, पण लगेच जेवण करत नाही. सकाळी ती थोडंसं तूप खाते आणि दुपारी १२ वाजता पहिलं जेवण करते. या जेवणात भात, भाजी, पोळी असं सगळं असतं. “मी कोणताही पदार्थ वर्ज्य केलेला नाही. मी सगळं खाते, पण संतुलित आणि योग्य वेळेत खाते,” असं तिने सांगितलं. योग्य आहार, वेळेची शिस्त आणि स्वतःच्या शरीराचं ऐकणं, हाच आपल्या फिटनेसचा खरा मंत्र असल्याचं मलायका अरोराने या मुलाखतीतून स्पष्ट केलं आहे.