Kishori Shahane | ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारचा ठाणे-मुंबई रस्त्यावर अपघात झाला. यात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र त्यांच्या कारचे नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी स्वत: व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. किशोरी शहाणे शूटिंगनिमित्त ठाणे-मुंबई मार्गावरून प्रवास करत होत्या. यावेळी एका बेशिस्त वाहनचालकानं त्यांच्या कारला बाजूनं धडक दिली. या धडकेमुळं किशोरी शहाणे यांच्या गाडीचा साईड मिरर पूर्णपणे तुटला आणि गाडीच्या दरवाजाचेही नुकसान झालं. अपघातानंतर संबंधित वाहनचालक तिथं न थांबता निघून गेल्यानं अभिनेत्रीनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘तुम्ही इतके असंवेदनशील कसं असू शकता?’ त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, खरं तर सगळ्यांनाच पुढं जाण्याची घाई असते, मलाही आहे. पण तुम्ही इतके असंवेदनशील कसं असू शकता? कोणाच्या तरी गाडीला धडक बसतेय, त्यांचं नुकसान होतंय याकडं तुमचं लक्षही नसतं. मला त्या व्यक्तीचा खूप राग येतोय, अशा घटनांमुळं केवळ पैसा आणि वेळच वाया जात नाही, तर मनस्तापही प्रचंड होतो, असं म्हणत किशोरी यांनी संताप व्यक्त केला. किशोरी यांच्या कामाबद्दल बोलायचं तर, ‘मोरूची मावशी’ या सुप्रसिद्ध व्यावसायिक नाटकाने त्यांना स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे सर्व स्तरावर कौतुक झाले. त्यानंतर “प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात केली. पुढे त्यांनी एकापेक्षा एक हटके आणि सुपरहिट चित्रपट दिले. किशोरी शहाणे यांनी चित्रपटांसह मालिकांमध्येही काम केले आहे. सध्या त्या हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. ‘माना की हम यार नहीं,’ या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हेही वाचा: Mithila Palkar: वीर दासला थप्पड मारण्याचा सीन सर्वात कठीण; मिथिला पालकरने ‘हॅपी पटेल’ चित्रपटाचा अनुभव सांगितला