Kiara Advani : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आठ तासांच्या कामाच्या शिफ्टची मागणी केल्यानंतर या विषयावर चित्रपटसृष्टीत मोठी चर्चा सुरू झाली आहे. आई झाल्यानंतर काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल राखण्यासाठी दीपिकाने ही मागणी केल्याचं सांगितलं जातं. काही चित्रपटांमध्ये ही अट मान्य न झाल्यामुळे तिने ते प्रोजेक्ट्स सोडले असल्याचीही चर्चा आहे. या वादावर आता नुकतीच आई झालेली अभिनेत्री कियारा अडवाणी हिने आपलं मत मांडलं आहे. कियारा आणि तिचा पती, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, यांना १५ जुलै रोजी सरायाह नावाची गोंडस मुलगी झाली आहे. आई झाल्यानंतर कियाराने पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत या विषयावर स्पष्ट भूमिका मांडली. एका मुलाखतीत बोलताना कियारा म्हणाली की, मानसिक आरोग्याला महत्त्व देणं अत्यंत गरजेचं आहे. “अतिरिक्त कामाचा ताण कोणत्याही क्षेत्रासाठी फायदेशीर नसतो,” असं ती म्हणाली. कामाच्या ठिकाणी आणि घरीही ती तीन गोष्टी सर्वांत महत्त्वाच्या मानते, त्या म्हणजे सन्मान, समतोल आणि आदर. मानसिक थकवा दूर करण्यासाठी काय मदत होतं, असं विचारलं असता कियारा हसत म्हणाली, “माझ्या मुलीचं हसणं आणि खिदळणं ऐकणं हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं औषध आहे.” दरम्यान, आई झाल्यानंतर कियाराचा पुढचा चित्रपट ‘Toxic : A Fairy Tale for Grown-Ups’ असणार आहे. या चित्रपटात ती नादिया ही भूमिका साकारणार असून, ही भूमिका शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असल्याचं तिने सांगितलं आहे. कियाराच्या मते, ही तिच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वांत कठीण आणि बदल घडवणारी भूमिका आहे.