Kangana Ranaut: ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांनी ‘छावा’ चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. एका मुलाखतीत रहमान यांनी ‘छावा’मुळे समाजात दुभंग निर्माण होतो, असे विधान केले होते. या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच अभिनेत्री व मंडीच्या खासदार कंगना रनौत यांनीही रहमान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कंगना रनौत यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे रहमान यांना थेट लक्ष्य केले. त्यांनी लिहिले की, “मी एका विशिष्ट राजकीय विचारधारेचे समर्थन करते म्हणून मला इंडस्ट्रीत पक्षपात आणि भेदभाव सहन करावा लागतो. पण तुमच्यासारखा पक्षपाती आणि द्वेषाने भरलेला माणूस मी आजवर पाहिला नाही.” कंगनाने पुढे सांगितले की, तिला आपल्या दिग्दर्शित ‘इमरजेंसी’ चित्रपटाची कथा रहमान यांना ऐकवायची होती. मात्र त्यांनी भेटायलाही नकार दिला. “तुम्हाला ही ‘प्रोपगंडा फिल्म’ वाटत होती, असे मला सांगण्यात आले. प्रत्यक्षात विरोधी पक्षातील नेत्यांनीही त्या चित्रपटाचे कौतुक केले होते आणि कुणीही त्याला प्रोपगंडा म्हटले नव्हते. पण तुम्ही तुमच्या द्वेषात इतके आंधळे झाला आहात की मला तुमची कीव वाटते,” असे कंगनाने म्हटले आहे. दरम्यान, ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवत सुमारे ८०० कोटींची कमाई केली आहे. ए. आर. रहमान सध्या आगामी भव्य चित्रपट ‘रामायण’साठी संगीत देणार असून, या प्रकल्पात त्यांच्यासोबत हॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार हान्स झिमरही असणार आहेत.