Kangana Ranaut : बॉलिवूडमधील स्पष्टवक्ती अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघाच्या खासदार कंगना रनौत बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर होती. या काळात ती प्रामुख्याने राजकारणात सक्रिय होती. संसदेत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर केलेल्या जोरदार टीकेनंतर आता कंगना पुन्हा एकदा आपल्या आवडत्या क्षेत्रात, म्हणजेच चित्रपटांच्या सेटवर परतली आहे. कंगनाने सोशल मीडियावर शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सेटवर अत्यंत आनंदी आणि उत्साही दिसत आहे. या पोस्टमधून तिने आपल्या नव्या चित्रपटाची सुरुवात झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. ‘भारत भाग्य विधाता’च्या शूटिंगला सुरुवात कंगना रनौत सध्या ‘भारत भाग्य विधाता’ या नव्या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती दिग्दर्शक मनोज तापडिया यांच्यासोबत दिसत आहे. सेटवर सर्वांशी संवाद साधत असताना मनोज तापडिया तिला सीन समजावून सांगताना दिसतात. या व्हिडीओसोबत कंगनाने लिहिलं आहे, “फिल्मच्या सेटवर परत येऊन खूप छान वाटत आहे.” ‘इमरजन्सी’ या चित्रपटानंतर दीर्घकाळानंतर कंगना पुन्हा एका नव्या प्रोजेक्टवर काम करत आहे. देशभक्तीची आणि वीरतेची कथा ‘भारत भाग्य विधाता’ हा एक देशभक्तीपर चित्रपट असून, यात देशासाठी लढलेल्या आणि बलिदान दिलेल्या अशा वीरांच्या कथा मांडल्या जाणार आहेत, ज्यांची माहिती फार कमी लोकांना आहे. चित्रपटात शौर्य, त्याग आणि राष्ट्रप्रेम यांचा ठळकपणे उल्लेख असेल. निर्मिती आणि दिग्दर्शन या चित्रपटाची निर्मिती यूनोइया फिल्म्सच्या बबिता आशिवाल आणि फ्लोटिंग रॉक्स एंटरटेनमेंटचे आदी शर्मा करत आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन मनोज तापडिया करत असून त्यांनी यापूर्वी ‘मद्रास कॅफे’, ‘चीनी कम’, ‘एनएच10’ आणि ‘माई’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ‘इमरजन्सी’चा बॉक्स ऑफिस प्रवास कंगनाचा शेवटचा चित्रपट ‘इमरजन्सी’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नव्हता. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती कंगनाने स्वतः केली होती, तसेच तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. सुमारे ६० कोटींच्या बजेटचा हा चित्रपट भारतात केवळ २० कोटींची कमाई करू शकला होता. आता ‘भारत भाग्य विधाता’च्या माध्यमातून कंगना रनौत पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.