Jacqueline Sukesh : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने ख्रिसमसच्या निमित्ताने जॅकलीनसाठी पुन्हा एकदा तुरुंगातून लव्ह लेटर पाठवलं आहे. या पत्रामध्ये सुकेशने जॅकलीनला ख्रिसमसच्या शुभेच्छा देत तिला कोट्यवधी रुपयांचं आलिशान गिफ्ट दिल्याचा दावा केला आहे. जॅकलीनने यापूर्वीच सुकेशसोबत आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं असतानाही, सुकेशकडून वारंवार पाठवली जाणारी पत्रं आणि दावे यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नव्या लव्ह लेटरमध्ये सुकेशने जॅकलीनसोबत घालवलेल्या क्षणांची आठवण काढली आहे. सुकेशने पत्रात लिहिलं आहे की, ख्रिसमस हा दिवस त्याला नेहमीच जॅकलीनसोबत घालवलेल्या वेळेची आठवण करून देतो. “हा दिवस तुझ्यावरील वेड्या प्रेमाची आठवण करून देतो. या खास दिवशी तुझ्यासोबत नसल्याचं मला दुःख आहे,” असंही त्याने नमूद केलं आहे. याच पत्रात सुकेशने जॅकलीनसाठी दिलेल्या कथित गिफ्टचा उल्लेख केला आहे. “बेबी, या खास दिवशी मी तुला आपलं ‘लव्ह नेस्ट’ गिफ्ट करत आहे. बेव्हर्ली हिल्समधील तुझं नवीन घर. मी आपल्या दोघांसाठी बनवलेलं तेच घर. आज ख्रिसमसच्या दिवशी मी तुला हे गिफ्ट देत आहे. हे आपल्या आधी प्लॅन केलेल्या घरापेक्षा मोठं आणि अधिक भव्य आहे,” असं सुकेशने लिहिलं आहे. या घराच्या परिसरात १९ होलचा गोल्फ कोर्स असल्याचाही दावा त्याने केला आहे. इतकंच नव्हे तर सुकेशने या कथित आलिशान घराची तुलना थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मार-ए-लागो या प्रसिद्ध प्रॉपर्टीशी केली आहे. “पूर्ण अमेरिकेत असं घर कुठेच नसेल. थट्टेने सांगायचं तर आपलं लव्ह नेस्ट ट्रम्पच्या मार-ए-लागोला देखील हेवा वाटेल,” असं त्याने पत्रात नमूद केलं आहे. दरम्यान, ही पहिलीच वेळ नाही की सुकेशने तुरुंगातून जॅकलीनसाठी लव्ह लेटर पाठवलं आहे. यापूर्वीही अशा अनेक पत्रांमुळे जॅकलीन मानसिक त्रासाला सामोरी गेल्याचं तिने सांगितलं असून, दिल्ली न्यायालयात याबाबत तक्रारही दाखल केली आहे. तरीही सुकेशकडून येणारे असे दावे आणि पत्रं थांबत नसल्याने हा वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.