Hrithik Roshan Birthday : बॉलीवूडचा ‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता ऋतिक रोशन आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. 10 जानेवारी 1974 रोजी मुंबईत जन्मलेल्या ऋतिकने आपल्या अभिनय, जबरदस्त डान्स आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, त्याचा हा यशाचा प्रवास सोपा नव्हता. संघर्ष, आजारपण आणि आत्मविश्वासाच्या लढाईतून त्याने हे यश मिळवलं आहे. ऋतिक रोशन एका प्रसिद्ध फिल्मी कुटुंबातून येतो. त्याचे वडील राकेश रोशन हे प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक आहेत, तर आई पिंकी रोशन गृहिणी आहेत. आजोबा रोशनलाल नागरथ हे दिग्गज संगीतकार होते आणि काका राजेश रोशन हे नावाजलेले संगीत दिग्दर्शक आहेत. एवढं मोठं फिल्मी पार्श्वभूमी असतानाही ऋतिकचा संघर्ष कमी नव्हता. बालपणी मानसिक आणि शारीरिक अडचणी ऋतिकला लहानपणी हकलण्याची समस्या होती. त्यामुळे लोकांसमोर बोलताना त्याला खूप त्रास व्हायचा. याशिवाय त्याच्या उजव्या हाताला एक अतिरिक्त अंगठा होता, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी झाला होता. शाळेत अनेकदा मुलं त्याची थट्टा करत असत. त्यामुळे तो स्वतःला एकटं आणि वेगळं समजू लागला होता. पहिल्या चित्रपटापूर्वी हा अंगठा काढून टाकण्याचा त्याचा विचार होता, मात्र आईने दिलेल्या सल्ल्यामुळे त्याने स्वतःला जसं आहे तसं स्वीकारायला शिकवलं. 21 व्या वर्षी समोर आली मोठी अडचण वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी ऋतिकला स्कोलियोसिस या गंभीर आजाराचं निदान झालं. या आजारात मणक्याची हाडं वाकडी होतात. डॉक्टरांनी त्याला कधीही डान्स करता येणार नाही, असं सांगितलं होतं. पण ऋतिकने हार मानली नाही. नियमित व्यायाम, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर त्याने या आजारावर मात केली आणि पुढे बॉलीवूडमधील सर्वोत्तम डान्सर्सपैकी एक ठरला. ‘कहो ना… प्यार है’ने बदललं आयुष्य सन 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कहो ना… प्यार है’ या चित्रपटातून ऋतिकने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आणि ऋतिक रातोरात स्टार झाला. त्यानंतर ‘धूम 2’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘सुपर 30’, ‘वॉर’ अशा अनेक हिट चित्रपटांमधून त्याने आपली अभिनय क्षमता सिद्ध केली. लवकरच दिसणार ‘वॉर 2’मध्ये वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ऋतिक रोशन लवकरच ‘वॉर 2’ या चित्रपटात दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या आसपास प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. आज ऋतिक रोशन फक्त सुपरस्टार नाही, तर संघर्षातून यश मिळवण्याची जिवंत प्रेरणा आहे.