Homemade Toner: हिवाळ्यात त्वचा लवकर कोरडी आणि खरबरीत होते. त्यामुळे त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी टोनरचा वापर खूप महत्त्वाचा असतो. बाजारात मिळणारे टोनर महाग असतात आणि काही वेळा त्यामधील केमिकल्स त्वचेला नुकसानही करतात. अशा वेळी घरगुती टोनर हा स्वस्त, सुरक्षित आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे हा टोनर तुम्ही फक्त १० रुपयांत तयार करू शकता. घरच्या घरी बनवलेला टोनर केमिकल-फ्री असतो आणि जवळजवळ सर्वच त्वचा प्रकारांना सूट होतो. तो त्वचेतील नैसर्गिक तेलाचं संतुलन राखतो, पोअर्स घट्ट करतो, कोरड्या त्वचेला आराम देतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणतो. गुलाबजल आणि काकडीचा टोनर हा टोनर हिवाळ्यात त्वचेला थंडावा आणि ताजेपणा देतो. काकडी त्वचेला हायड्रेट ठेवते आणि सूज कमी करते. कसा बनवायचा? एक काकडी किसून तिचा रस काढा. त्यात तेवढ्याच प्रमाणात गुलाबजल मिसळा. सकाळी आणि रात्री कॉटनच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. ग्रीन टी टोनर ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेचा निस्तेजपणा दूर करून चमक वाढवतात. कसा बनवायचा? ग्रीन टी उकळून पूर्णपणे थंड करा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा. यामुळे त्वचा ताजीतवानी होते आणि पोअर्स घट्ट होतात. ऑयली व निस्तेज त्वचेसाठी विशेष उपयुक्त. एलोवेरा टोनर हिवाळ्यात कोरड्या आणि खडबडीत त्वचेसाठी एलोवेरा खूप फायदेशीर असतो. कसा बनवायचा? २ चमचे एलोवेरा जेलमध्ये अर्धा कप पाणी मिसळा. त्वचेची जळजळ, लालसरपणा आणि सोलणं कमी होतं. त्वचा लगेच मऊ वाटते. लिंबू आणि पाण्याचा टोनर त्वचेतील तेलाचं संतुलन बिघडल्यास हा टोनर उपयोगी ठरतो. कसा बनवायचा? एका ग्लास पाण्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. पोअर्स स्वच्छ होतात, तेलकटपणा कमी होतो आणि चेहरा फ्रेश दिसतो. टीप: फार कोरडी त्वचा असणाऱ्यांनी हा टोनर कमी प्रमाणात वापरावा. ही माहिती सामान्य स्वरूपाची आहे. त्वचेशी संबंधित कोणतीही अडचण असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.