Sonu Sood : इंडिगो एअरलाइन सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द होत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत आणि अनेक विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्थितीवर अनेक सेलिब्रिटी नाराजी व्यक्त करत असताना, समाजकार्यासाठी ओळखले जाणारे अभिनेता सोनू सूद मात्र इंडिगोच्या स्टाफच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. लोकांना जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन सोनू सूद यांनी सोशल मीडियावरून एक व्हिडिओ शेअर करत एअरलाइन स्टाफची बाजू मांडली. त्यांनी सांगितले, “फ्लाइटला उशिर होणे नक्कीच त्रासदायक असते. पण जे लोक ते सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचीही परिस्थिती समजून घ्या. कृपया इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी नम्रतेने वागा. फ्लाइट रद्द होण्याचा संपूर्ण ताण त्यांच्या अंगावर असतो. स्वतःला त्यांच्या जागी ठेवा आणि विचार करा.” सोनू पुढे म्हणाले की, स्टाफलाही पुढचे वेळापत्रक काय आहे हे स्पष्ट सांगितले जात नाही. वरून जे मेसेज येतात तेच ते प्रवाशांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना साथ देणे गरजेचे आहे. “माझ्या कुटुंबालाही उशीर झाला होता” व्हिडिओत सोनू यांनी सांगितले की त्यांचे स्वतःचे कुटुंबही या काळात प्रवास करत होते आणि त्यांच्या फ्लाइटलाही उशीर झाला होता. तरीही त्यांनी संयम ठेवला आणि कर्मचाऱ्यांशी सहानुभूती दाखवण्याचे आवाहन केले. लोक विमानतळांवर होत असलेल्या भांडणांवर, उग्र वर्तनावर टीका करत सोनू म्हणाले की, अशा वर्तनापेक्षा स्टाफला आधार देणे अधिक गरजेचे आहे. इंडिगोकडून दोनदा माफी गेल्या तीन दिवसांपासून देशभरात इंडिगोच्या अनेक उड्डाणांना उशीर होत आहे किंवा ती रद्द होत आहेत. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले असून एअरलाइनवर नाराजी व्यक्त करत आहेत. इंडिगोने मात्र सध्याच्या परिस्थितीवर दोन वेळा माफी मागत खेद व्यक्त केला आहे. उड्डाणातील उशीरामुळे अनेक नामांकित व्यक्तींनाही त्रास सहन करावा लागला आहे.