Anushka Sharma : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी मानलं जातं. ‘विरुष्का’ची केमिस्ट्री जितकी चर्चेत असते, तितकाच त्यांच्या फिटनेसचाही नेहमी उल्लेख केला जातो. दोन मुलांची आई असूनही अनुष्का आजही कमालीची फिट, फ्रेश आणि एनर्जेटिक दिसते. वामिका आणि अकायच्या जन्मानंतर अनुष्काने आपल्या जीवनशैलीत केलेले बदल यामागचं मुख्य कारण आहेत. अनुष्काने एका मुलाखतीत तिची संपूर्ण दिनचर्या उघड केली आहे. अनुष्का सांगते, “सुरुवातीला मी आणि वामिका दोघीही रात्री लवकर झोपायचो. हळूहळू ही सवय संपूर्ण घरात पसरली.” आज तिचा दिवस पहाटे साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान सुरू होतो. ती संध्याकाळी ५.३० वाजताच रात्रीचं जेवण करते आणि त्यानंतर लवकर झोपण्याची सवय तिने लावून घेतली आहे. यामुळे तिला चांगली झोप लागते, सकाळी फ्रेश वाटतं आणि मानसिक ताणही कमी होतो. साधा, घरगुती आणि शुद्ध आहार अनुष्का शाकाहारी आणि व्हेगन असल्यामुळे तिच्या आहारात फळं, भाज्या आणि घरगुती पदार्थांचा समावेश असतो. सकाळचा नाश्ता: टोस्ट किंवा ताजी फळं दुपारपूर्वी: लिंबूपाणी किंवा नारळपाणी दुपारचं जेवण: चपाती, डाळ, भाजी, सॅलड संध्याकाळचा नाश्ता: सिझनल फळं रात्रीचं जेवण: सॅलड, एक वाटी सूप आणि भाताचे हलके पदार्थ ती बाहेरचं, शिळं किंवा फार फॅन्सी अन्न खात नाही. सलग महिनोन्महिने एकच पदार्थ अनुष्काने सांगितलं की, “मी सलग काही आठवडे किंवा महिने एकच पदार्थ खाऊ शकते.” एकदा तिने महिनाभर रात्री खिचडी आणि वांग्याचं भरीत खाल्लं होतं. तर सकाळच्या नाश्त्याला सलग ६ महिने इडली-सांबर खाल्ल्याचं तिने स्पष्ट केलं. तिच्या मते, आवडीचं अन्न खाल्ल्याने मानसिक आरोग्य चांगलं राहतं. गरोदरपणातही संयम अनुष्का म्हणते, “गरोदरपणात मला फारसे डोहाळे लागले नाहीत. पण वडापाव खायची खूप इच्छा व्हायची.” तिच्या मते, एखाद्या पदार्थाची तीव्र इच्छा झाली तर तो पदार्थ खायला हरकत नाही, पण प्रमाण महत्त्वाचं आहे. वडापाव, भजी, छोले-भटुरे ती खाते, पण अतिरेक करत नाही. व्हेगन जीवनशैली आणि व्यायाम अनुष्का पूर्णपणे व्हेगन आहे. ती दूध, दुग्धजन्य पदार्थ, ग्लूटेन आणि साखर टाळते. याऐवजी राजगिरा, बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खाते. यासोबतच नियमित व्यायाम, योग आणि सक्रिय जीवनशैली यावरही ती भर देते. दिवसभरात ती ३ ते ४ लिटर पाणी पिते. साधी जीवनशैली, शिस्तबद्ध दिनचर्या, संतुलित आहार आणि मानसिक शांतता यामुळेच दोन मुलं होऊनही अनुष्का शर्मा आजही तितकीच फिट, ताजीतवानी दिसते.