मुंबई: भारतीय शेअर बाजारातील तेजीचा ओघ आगामी काळातही कायम राहण्याची शक्यता असून, वर्ष २०२६ च्या अखेरपर्यंत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ ९३,९१८ अंकांच्या ऐतिहासिक पातळीला स्पर्श करेल, असा अंदाज ‘क्लाइंट असोसिएट्स’ (CA) या नामांकित संपत्ती व्यवस्थापन कंपनीने वर्तवला आहे. बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वार्षिक इक्विटी मूल्यांकन अहवालात कंपनीने ही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. ११ टक्क्यांच्या वाढीची शक्यता – अहवालात नमूद केल्यानुसार, सध्याच्या पातळीवरून सेन्सेक्समध्ये डिसेंबर २०२६ पर्यंत सुमारे ११ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. जरी सध्या जागतिक बाजारपेठेत अस्थिरतेचे वातावरण असले, तरी भारताची भक्कम आर्थिक स्थिती आणि कंपन्यांच्या उत्पन्नातील सुधारणा यामुळे बाजार नवनवीन उच्चांक प्रस्थापित करेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. गुंतवणुकीसाठी सोने-चांदी ‘सुरक्षित कवच’ बाजारपेठेतील वाढत्या चढ-उतारांच्या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये सोने आणि चांदी या धातूंनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०२५ मध्ये या मौल्यवान धातूंनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, जागतिक भू-राजकीय तणाव, डॉलरमधील घसरण आणि मध्यवर्ती बँकांकडून होत असलेली सोन्याची खरेदी यामुळे या धातूंची मागणी वाढली आहे. आगामी काळातही जोखीम व्यवस्थापनासाठी सोने-चांदी हे गुंतवणुकीचे संतुलित पर्याय ठरतील, असे अहवालात म्हटले आहे. तज्ज्ञांचे मत: निवडक क्षेत्रांत संधी क्लाइंट असोसिएट्सचे गुंतवणूक संशोधन प्रमुख नितिन अग्रवाल यांच्या मते, “२०२६ मध्ये शेअर बाजाराची दिशा केवळ व्यापक तेजीवर अवलंबून न राहता, मूलभूत घटकांवर आधारित असेल. भारताचा विकासदर (GDP) ६.८ टक्के राहण्याचा अंदाज असल्याने अर्थव्यवस्थेत मजबूती आहे. मात्र, शेअर बाजाराचे मूल्यांकन सध्या उच्च पातळीवर असल्याने गुंतवणूकदारांनी शिस्तबद्ध आणि संतुलित धोरण स्वीकारणे आवश्यक आहे.”