नवी दिल्ली – भारतात वाहन घेऊ इच्छिणार्यांची संख्या शहराबरोबरच खेड्यातही वाढत आहे. रस्त्यांची संख्या आणि दर्जा वाढत आहे. अशा परिस्थितीत वाढलेल्या ग्राहकांना पेट्रोल पुरविण्यासाठी तेल कंपन्यांनी नवीन पेट्रोल पंप उघडण्याची मोहीम सुरू केली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये देशातील पेट्रोल पंपांची संख्या पन्नास हजारावरून एक लाखावर गेली आहे. तेल मंत्रालयाच्या पेट्रोल पंपासंदर्भातील विभागाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, आता भारतातील पेट्रोल पंपांची संख्या जगात तिसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून दुसर्या क्रमांकावर चीन आहे. अमेरिकेचे क्षेत्रफळ भारतापेक्षा कितीतरी मोठे आहे. अमेरिकेमध्ये 1 लाख 96 हजार तर चीनमध्ये 1 लाख 15 हजार पेट्रोल पंप असल्याचे समजले जाते. सध्या अस्तित्वात असलेल्या एक लाख पेट्रोल पंपातील 90% पेट्रोल पंप सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे आहेत. त्यामध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन चा समावेश आहे. खासगी क्षेत्रातील नायरा एनर्जीचे देशात 6,921, रिलायन्स इंडस्ट्रीज व ब्रिटिश पेट्रोलियमचे 2,114 तर शेल कंपनीचे 346 पेट्रोल पंप देशात कार्यरत आहे. खासगी क्षेत्राला पेट्रोल पंप उघडण्याची परवानगी 2004 मध्ये देण्यात आली होती. त्यानंतर एकूण पेट्रोल पंपात खाजगी क्षेत्राचा वाटा आता दहा टक्क्यापर्यंत गेला आहे. ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांची संख्या वाढत आहे. दहा वर्षापूर्वी एकूण पेट्रोल पंपात ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांची संख्या 22 टक्के होती. ती आता 29 टक्क्यावर आली आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलशिवाय पर्याय इंधन म्हणजे सीएनजी पुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर पेट्रोल पंपाच्या जवळच इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंगची व्यवस्था करण्याची प्रक्रिया वेग घेत आहे.