मुंबई – शेअर बाजारात गेल्या पाच वर्षात एकतर्फी तेजी नसली तरी दहा कंपन्यांच्या बाजार मूल्यात या पाच वर्षात तब्बल 46 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर बाळगणार्यांना चांगला परतावा मिळाला आहे. 2020 ते 25 या कालावधीत उत्तम कामगिरी करणार्या या कंपन्यांमध्ये बँका, तंत्रज्ञान, इंडस्ट्रियल्स, एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्या आहेत. म्हणजे विविध क्षेत्रातील चांगल्या कंपन्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. मोतीलाल ओसवाल या संस्थेने केलेल्या विश्लेषणानुसार या पाच वर्षात भारती एअरटेल कंपनीचे बाजार मूल्य तब्बल 7.9% वाढले आहे. या कंपनीचा सीएजीआर म्हणजे वार्षिक वाढ 32 टक्के इतकी आहे. 2020 मध्ये या कंपनीचे बाजार मूल्य 2.4 लाख कोटी होते. ते आता 10.3 लाख कोटीे आहे. या कालावधीत आयसीआयसीआय बँकेचा सीएजीआर 34% असून 2020 मध्ये या बँकेचे बाजार मूल्य 2.1 लाख कोटी रुपये होते. ते आता 9.5 लाख कोटी रुपये झाले आहे. या पाच वर्षात यामध्ये 7.4 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. स्टेट बँकेचे बाजार मूल्य या कालावधीत 1.7 लाख कोटी रुपयावरून 6.9 लाख कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत 33% सीएजीआर प्रमाणे या बँकेचे बाजार मूल्य 5.6 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. बजाज फायनान्स ही कंपनी या काळात नावारुपाला आली. या कंपनीचे बाजार मूल्य या कालावधीत 1.3 लाख कोटी रुपयांवरून 5.5 लाख कोटी रुपये झाले आहे. म्हणजे यात 4.2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या कंपनीचा सीएजीआर ते 30 टक्के इतका भरतो. या कालावधीत लार्सन अँड ट्युब्रोेचा सीएजीआर 35 टक्के होता. या कंपनीचे बाजार मूल्य या काळात चार पटीने वाढून 4.8 लाख कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत या कंपनीच्या बाजार मूल्यात तब्बल चार लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आयटीसी कंपनीचे बाजार मूल्य या कालावधीत 2.1 लाख रुपयावरून 24% सीएजीआरने 5.1 लाख कोटी रुपये झाले आहे. म्हणजे यात 3.8 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. एचसीएल कंपनीचे बाजार मूल्य कालावधीत 1.1 लाख कोटी रुपयांवरून 4.3 लाख कोटी रुपये झाले आहे. 33 टक्के सीएजीआर प्रमाणे यात 3.7 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. सनफार्मा कंपनीचे बाजार मूल्य या कालावधीत पाच पटीने वाढून 4.1 लाख कोटी रुपये झाले आहे. म्हणजे या कालावधीत या कंपनीचे बाजार मूल्य 38% सीएजीआर प्रमाणे 3.5 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. महिंद्रा कंपनीने या काळात 57% सीएजीआर प्रमाणे उत्तम कामगिरी केली आहे. या कालावधीत कंपनीचे बाजार मूल्य 3.05 लाख कोटी रुपयांनी वाढून केवळ 35 हजार कोटी रुपयांवरून 3.3 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.