नवी दिल्ली – भारताने अनेक देशाबरोबर मुक्त व्यापार करार केला आहे. अशा प्रकारचा व्यापार करार कॅनडा आणि अमेरिकेबरोबर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असून या दोन देशाबरोबरची बोलणी अंतिम टप्प्यात असल्याचे पुन्हा वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले. अशा प्रकारचे व्यापार करार करण्यासाठी बोलणी पूर्ण होण्यास वेळ लागत असतो. मात्र दीर्घ पल्ल्यात या व्यापार कराराचा दोन्ही देशांना लाभ होत असतो. त्यामुळे बोलणे लांबीवर पडली असली तरी नेटाने दोन्ही व्यापार करार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, ब्रिटन आणि अमेरिका परस्परांना गुप्त माहितीची देवाण-घेवाण करीत असतात. या समूहातील ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँडबरोबर भारताचा व्यापार करार झाला आहे. ब्रिटन आणि कॅनडाबरोबर बोलणे सकारात्मक आहेत. त्याचबरोबर अमेरिकेबरोबरही बोलणी चालू आहेत असे त्यांनी सांगितले. सध्या विविध देशांदरम्यान तणाव चालू आहेत. त्याचबरोबर करोनानंतर जागतिक व्यापारात अडथळे आले आहेत. अशा परिस्थितीत आपली निर्यात वाढविण्यासाठी विशिष्ट देशाबरोबर व्यापार करार करण्याची गरज वाढली आहे. हे ध्यानात घेऊन भारताने गेल्या पाच वर्षापासून व्यापार करार करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. अमेरिका भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा देश आहे. त्यामुळे या देशाबरोबर करार व्हावा अशी भारताची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.