वॉशिंग्टन – अमेरिकेवरील वाढते कर्ज आणि निर्यात वाढत नसल्यामुळे चालू खात्यावरील वाढलेली तूट या कारणामुळे अमेरिकन डॉलरचे मूल्य सध्या चार वर्षाच्या निचांंकावर आहे. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान अमेरिकेच्या फेडरल रिझर्वची पत धोरण विषयक बैठक चालू झाली असून गुरुवारी व्याजदरासंदर्भातील निर्णय जाहीर होणार आहे. वाढलेली महागाई आणि जीडीपीची आकडेवारी पाहता डोनाल्ड ट्रम्प यांनी व्याजदर कपात करण्याची सूचना करूनही फेडरल रिझर्व व्याजदर कपात करणार नाही असे समजले जात आहे. दरम्यान जगातील सहा मुख्य चलनाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स घसरून 95.2 अंकावर आला. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येण्यापूर्वी हा निर्देशांक 110 अंकावर होता. डॉलरची मागणी वेगाने कमी होत आहे आणि त्या ऐवजी डॉलरपेक्षा अधिक सुरक्षित सोने आणि चांदी खरेदी करण्याकडे जागतिक गुंतवणूकदारांचा ओढा कायम आहे. अशा परिस्थितीत डॉलर घसरत आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा ही कमी होत आहे. प्राप्त माहितीनुसार सध्या अमेरिकन कर्जरोख्यामध्ये झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक सोन्यामध्ये झाली असल्याचे सांगितले जाते. सध्या जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 5,200 डॉलर आणि चांदीचा दर वाढून 110 डॉलर प्रति औंस या पातळीपर्यंत गेला आहे. ट्रम्प यांचे बेफाम व्यापार युद्ध आणि त्यांनी विविध देशांविरोधात उघडलेली मोहीम या कारणामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत असून त्यामुळे सोने आणि चांदीत गुंतवणूक वाढत असल्याचे सांगितले जाते. केवळ अमेरिकन डॉलरच कमकुवत होत नसून अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरचे भाव जास्त फुगले असल्याची भावना जागतिक पातळीवर निर्माण झाली आहे. दरम्यान अमेरिकन डॉलर कोसळत असला तरी भारतीय रुपयाचे मूल्य मात्र डॉलरच्या तुलनेत बुधवारी 11 पैशांनी कमी होऊन 91.79 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेले. खनिज तेलाचे दर वाढून 67 डॉलरपर्यंत गेल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर परिणाम झाला असल्याचे समजले जाते.