मुंबई – तंबाखूजन्य उत्पादनावर एक फेब्रुवारीपासून अतिरिक्त उत्पादन शुल्क लावण्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली. यामुळे तंबाखूजन्य उत्पादन करणार्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात गुरुवारी मोठी घट नोंदली गेली. गॉडफ्रे फिलिप्स कंपनीचा शेअर सतरा टक्क्यांनी कोसळून 2,289 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला. त्याचबरोबर आयटीसी कंपनीचा शेअर दहा टक्क्यांनी कोसळून 363 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता. सरकारच्या अधिसूचनेमुळे एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात बरीच घट झाली होती. जीएसटी कपातीमुळे निर्माण झालेले उमेदीचे वातावरण या नव्या अधिसूचनेमुळे कमी झाले असल्याचे मग जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले. बीएसटी इंडस्ट्रीज या कंपनीचा शेअर एक टक्क्याने कमी होऊन 255 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता. दरम्यान फेब्रुवारीपासून तंबाखूजन्य पदार्थ बर्याच प्रमाणात मागत होणार असल्यामुळे या उत्पादनांची विक्री घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. अशा परिस्थितीत संबंधित कंपन्यांचा महसूल आणि नफा कमी होणार आहे त्यामुळे या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट होत असल्याचे विश्लेषकाने यासंदर्भात नमूद केले. नववर्षात एक फेब्रुवारीपासून तंबाखूच्या उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि पान मसाल्यावर नवीन उपकर आकारला जाणार आहे. हे कर वस्तू आणि सेवा करा व्यतिरिक्तचे कर असतील. पान मसाला, सिगारेट, तंबाखू आणि तत्सम उत्पादनांवर 40 टक्के जीएसटी दर लागू होईल, तर बिडीवर 18 टक्के वस्तू आणि सेवा कर लागेल. याव्यतिरिक्त, पान मसाल्यावर आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर आकारला जाईल, तर तंबाखू आणि संबंधित उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले जाईल.