Stock Market Today: गेल्या सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी (२२ जानेवारी) भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी परतली. जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतांमुळे बाजारात चौफेर खरेदी पाहायला मिळाली. दिवसभराच्या व्यवहारानंतर बीएसई (BSE) सेन्सेक्स ३९८ अंकांच्या वाढीसह ८२,३०७ वर बंद झाला, तर निफ्टी १३२ अंकांच्या तेजीसह २५,२९० च्या स्तरावर स्थिरावला. बाजारातील तेजीची प्रमुख कारणे – आजच्या तेजीमागे भू-राजकीय तणावात झालेली घट हे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडबाबत आपली भूमिका मवाळ केली असून, १ फेब्रुवारीपासून युरोपीय देशांवर लादले जाणारे नवीन टॅरिफ (शुल्क) सध्या स्थगित केले आहेत. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठांना मोठा दिलासा मिळाला असून गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी भर – बाजार वधारल्याने गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली. बीएसईमध्ये सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४५४.०९ लाख कोटी रुपयांवरून वाढून ४५८.५७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. म्हणजेच एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ४.४८ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. सेक्टोरल इंडेक्सची कामगिरी – फायनान्शिअल्स, मेटल्स, एनर्जी आणि आयटी शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. निफ्टी-५० मधील ४० शेअर्स हिरव्या निशाण्यावर बंद झाले. केवळ रिअल्टी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स इंडेक्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. छोट्या आणि मध्यम कंपन्यांच्या शेअर्समध्येही उत्साह दिसून आला. बीएसई मिडकॅप १.२८% तर स्मॉलकॅप १.१३% वधारला. आजचे टॉप ‘गेनर्स’ आणि ‘लूसर्स’ – सेंसेक्समधील ३० पैकी २४ शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL) ३.७५ टक्क्यांच्या वाढीसह अव्वल स्थानी राहिला. त्यापाठोपाठ टाटा स्टील, अदाणी पोर्ट्स, एसबीआय (SBI) आणि बजाज फिनसर्व्ह या शेअर्समध्ये १.७३ ते २.६९ टक्क्यांची वाढ झाली. दुसरीकडे, इटरनल (Eternal) या शेअरमध्ये २.६१ टक्क्यांची मोठी घसरण झाली. याशिवाय टायटन, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक यांचे शेअर्स किरकोळ घसरणीसह बंद झाले. दरम्यान, आज शेअर बाजारात एकूण ४,३८५ शेअर्समध्ये व्यवहार झाले. २,९५२ शेअर्समध्ये वाढ झाली तर १,२७९ शेअर्समध्ये घसरण झाली. ६९ शेअर्स ५२-आठवड्यांचा उच्चांक गाठणारे ठरले तर २७६ शेअर्सनी ५२-आठवड्यांचा नीचांक गाठला.