Stock Market: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीचे निष्कर्ष समोर आल्यानंतर शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रातील समभागांच्या जोरावर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ २६६.४७ अंकांनी वधारून ८३,५८०.४० वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ५०.९० अंकांच्या वाढीसह २५,६९३.७० वर स्थिरावला. एफएमसीजी आणि बँकिंग क्षेत्राची दमदार कामगिरी आजच्या तेजीचे नेतृत्व प्रामुख्याने एफएमसीजी (FMCG) आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स कंपन्यांनी केले. यामध्ये आयटीसी (ITC) ५ टक्क्यांनी, तर हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) २.९६ टक्क्यांनी वधारले. क्षेत्रीय निर्देशांकाचा विचार करता निफ्टी एफएमसीजी २.२७ टक्क्यांनी, तर निफ्टी रियल्टी आणि प्रायव्हेट बँक क्षेत्रातही ०.६३ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली. ‘या’ शेअर्समध्ये नफा आणि तोटा – तेजीतील शेअर्स: आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, एचयूएल, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड आणि ॲक्सिस बँक. घसरणीतील शेअर्स: टेक महिंद्रा, टीसीएस, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस यांसारख्या आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज विक्रीचा दबाव दिसून आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये विक्री – लार्जकॅप शेअर्सच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये आज गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. निफ्टी मिडकॅप १०० इंडेक्स ०.०२ टक्क्यांनी घसरून ५९,५०२.७० वर बंद झाला, तर स्मॉलकॅप १०० इंडेक्समध्ये ०.२७ टक्क्यांची घसरण झाली. एसबीआय सिक्युरिटीजचे तांत्रिक तज्ज्ञ सुदीप शाह यांच्या मते, “निफ्टीची सुरुवात आज कमकुवत झाली होती, मात्र सत्रअखेर बाजार सावरला. नजीकच्या काळात निफ्टीसाठी २५,७५० ते २५,८०० ही महत्त्वाची अडथळ्याची पातळी (Resistance) आहे. जर बाजार या पातळीच्या वर टिकला, तर निफ्टी २६,२०० पर्यंत मजल मारू शकतो. सध्या २५,५०० ही निफ्टीसाठी भक्कम आधार पातळी (Support) म्हणून काम करेल.”