मुंबई – मागणी जास्त आणि पुरवठा कमी या परिस्थितीमुळे चांदीचे दर शुक्रवारी दोन लाख रुपये प्रति किलो या पातळीपर्यंत गेले होते. आगामी काळातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत 2026 च्या अखेरपर्यंत चांदीचे दर 20 टक्क्यांनी वाढवून 2 लाख 40 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे अॅक्सिस सिक्युरिटीज या संस्थेच्या या संदर्भातील विश्लेषणात्मक टिपणात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक बाजारात नजीकच्या काळात परिस्थितीजन्य कारणामुळे जर चांदीचा दर 1 लाख 70 हजार ते 1 लाख 78 हजार रुपयापर्यंत खाली गेला तर ही खरेदीची संधी ठरू शकते असेही सांगण्यात आले. 2011 ते 2025 या कालावधीत चांदीच्या दराचे विश्लेषण केले असता आगामी वर्षांमध्ये चांदीचा दर आणखी 20 टक्क्यापर्यंत वाढू शकतो. चांदीचा दर तांत्रिकदृष्ट्या जागतिक बाजारात 50 डॉलरच्यावर गेल्यानंतर चांदीचे दर आगामी काळात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जागतिक बाजारात चांदीचा दर 64 डॉलर प्रति औंस या पातळीपर्यंत गेलेला आहे. 2011 ते 13 या कालावधीत चांदीचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. आता चांदीचा दर 65 ते 67 डॉलर प्रति औंसावर गेल्यानंतर या पातळीवर काही प्रमाणात रेंगाळू शकतो. ही पातळी ओलांडल्यानंतर मात्र चांदीचा दर आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. 2024 पर्यंत सोन्याचा दर चांदीपेक्षा जास्त होता आणि अधिक वेगाने वाढत होता. मात्र 2024 च्या अखेरीस जागतिक पातळीवर घडलेल्या काही घटनांमुळे चांदी सोन्यापेक्षा अधिक वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. नव्या उद्योगात चांदीचा वापर वाढणार असल्यामुळे एक औद्योगिक उत्पादन म्हणून चांदीची मागणी वाढत आहे. हरित ऊर्जा क्षेत्रात चांदीची मागणी वाढत चालली आहे. सोलार फोटोहोल्टीक क्षेत्रात चांदीची मागणी चार वर्षात दुप्पट वाढून 94.4 दशलक्ष औंसावरुन 2024 मध्ये 243.7 दशलक्ष औंसावर गेली आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातील मागणी एकूण मागणीच्या 21 टक्क्यावर गेल्यामुळे चांदी सोन्यापेक्षा जास्त तेजित आहे. एकूण परिस्थिती पाहतात तांत्रिकदृष्टया चांदीने एकदा 67 डॉलरचा टप्पा ओलांडल्यानंतर चांदी 76 ते 80 डॉलर प्रति औंसापर्यंत वाढू शकते. परिस्थिती फारच खराब झाली तर 50 डॉलर हा चांदीला मजबूत आधार आहे.