मुंबई – रशिया- युक्रेन संघर्ष संपविण्यासाठी चालू असलेली बोलणी वेग घेत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत हा संघर्ष कमी झाला तर रशियाचे खनिज तेल जागतिक बाजारात उपलब्ध होईल. त्याचबरोबर तले उत्पादक देशांचे संघटना असलेल्या ओपीईसीने तेल उत्पादनात वाढ चालू ठेवली आहे. त्यामुळे खनिज तेलाचे दर सध्या 59 डॉलर प्रति पिंपळावर आले आहेत. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला आणि रुपयाला चांगला आधार मिळू शकेल असे समजले जात आहे. सध्या बाजारातील परिस्थितीनुसार अमेरिकन आणि मध्य आशियातील खनिज तेलाचे दर 56 ते 59 डॉलर प्रति पिंप दरम्यान आहेत. 2021 नंतर प्रथमच खनिज तेलाचे दरीत कमी पातळीवर आहेत. चालू आर्थिक वर्षात तेलाचा दर जवळजवळ 20 टक्क्याने कमी झाला आहे. ओपीइसी संघटनेने तेलाचे उत्पादन वाढविल्यामुळे तेलाचा साठा वाढला आहे. अशातच जर रशिया- युक्रेन संघर्ष समाप्त झाला आणि रशियाचे खनिज तेल जागतिक बाजारात उपलब्ध झाले तर तेलाचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त होऊ शकतो. यामुळे सध्या खनिज तेलाच्या ऑर्डर कमी होत आहेत. त्यामुळे दरही घसरत आहे. चीनकडूनही गेल्या वर्षाइतकी खनिज तेलाची मागणी यावर्षी होण्याची शक्यता कमी असल्यामुळे खनिज तेलाच्या किमतीवरील दबाव कमी होत असल्याचे सांगितले जाते. काहीही अटीवर युक्रेनने नाटोच्या सदस्यत्वाचा हट्ट सोडण्याचे संकेत दिले असतानाच अमेरिकेने भविष्यातील रशियाच्या आक्रमणाविरुद्ध संरक्षण करण्याची हमी देण्याची तयारी दर्शवली असल्याचे सांगितले जाते. युरोप आणि अमेरिकेदरम्यानही संरक्षण क्षेत्रात सहकार्य होण्याची शक्यता आहे. या घडामोडीचा खनिज तेलाच्या किमतीवर परिणाम होत आहे.