मुंबई – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात भूमिका आणखी ताठर केली आहे. अशा परिस्थितीत जागतिक राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार सावध आहेत. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक या कारणामुळे सलग दुसर्या दिवशी कमी पातळीवर बंद झाले. बुधवारी माहिती तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू आणि बँकांच्या शेअरची जास्त प्रमाणात विक्री झाली असल्याचे दिसून आले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 244 अंकांनी कमी होऊन 83,382 अंकावर बंद झाल. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 66 अंकांनी म्हणजे 0.26 टक्क्यांनी कमी होऊन 25,665 अंकावर बंद झाला. टीसीएस, एशियन पेंट्स, मारुती, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, लार्सन अँड ट्युबरो या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. टाटा स्टील, एनटीपीसी अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून विक्री चालूच असून मंगळवारी या गुंतवणूकदारांनी 1,499 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1,181 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. आशिया खंडातील दक्षिण कोरिया, जपान, हाँगकाँग आणि शांघाय येथील शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले होते. युरोपियन शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले तर अमेरिकन बाजाराचे निर्देशांक घसरले होते. दरम्यान खनिज तेलाच्या किमती वाढत आहेत हा भारतीय गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चिंतेची बाब आहे. सध्या खनिज तेलाच्या किमती जवळ जवळ 65 डॉलर प्रति पिंप या पातळीपर्यंत गेल्या आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचे संशोधन प्रमुख सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले की, भारतावर आगोदरच 50% आयात शुल्क असताना भारतावर इराणशी असलेल्या संबंधाबाबत आणखी 25 टक्के आयात शुल्क लावण्याची शक्यता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली आहे. अमेरिकेच्या नकारात्मक भूमिकेमुळे भारतातील परकीय गुंतवणूक परत जात आहे. अशा परिस्थितीत सावध गुंतवणूकदारांनी खरेदी टाळली असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर अमेरिकेच्या अध्यक्षांनी विविध देशाविरोधात लावलेल्या आयात शुल्क संदर्भातील खटल्यावर निर्णय बुधवारी उशिरा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जागतिक शेअर बाजारातही सावध वातावरण होते. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारातील व्यवहारावर अपेक्षेप्रमाणे झाला आहे. क्षेत्र घट /वाढ माहिती तंत्रज्ञान -1.30% रिअॅल्टी -0.98% ग्राहक वस्तू -0.96% वाहन – 0.62 टक्के धातू +2.67% सरकारी बँका +2.43% दूरसंचार + 0.46% ऊर्जा +0.64%