Share Market Today: भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (६ जानेवारी) सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीमुळे आणि जागतिक संकेतांमुळे बाजार दबावाखाली राहिला. दिवसभराच्या व्यवहाराअंती मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३७६.२८ अंकांनी (०.४४%) घसरून ८५,०६३.३४ वर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७१.६० अंकांनी (०.२७%) घसरून २६,१७८.७० च्या स्तरावर स्थिरावला. निफ्टीने २६,२०० चा महत्त्वाचा आधार (सपोर्ट) तोडल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गुंतवणूकदारांना मोठा फटका – बाजार कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. बीएसई (BSE) वरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज ४७९.४५ लाख कोटी रुपयांवर आले, जे मागील सत्रात ४८०.८० लाख कोटी रुपये होते. परिणामी, एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे सुमारे १.३५ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. घसरणीची मुख्य कारणे बड्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये परकीय गुंतवणूकदारांनी (FII) केलेली मोठी विक्री बाजारावर भारी पडली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ‘टॅरिफ’ (आयात शुल्क) वाढवण्याबाबत केलेल्या विधानामुळे गुंतवणूकदार सावध भूमिकेत दिसले. एनर्जी आणि ऑईल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफेखोरी केली. कोणत्या क्षेत्रात तेजी, कुठे घसरण? घसरण: ऑईल अँड गॅस, एनर्जी, इन्फ्रा, मीडिया आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रातील शेअर्समध्ये ०.६ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. तेजी: आयटी (IT), फार्मा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSU Banks) आणि मेटल इंडेक्समध्ये ०.३ ते १.७ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली. ‘हे’ शेअर्स ठरले टॉप गेनर्स आणि लूझर्स तेजीतील शेअर्स (Top Gainers): सेन्सेक्समधील ३० पैकी १६ शेअर्स वधारले. यात आयसीआयसीआय बँक (२.८७%) अग्रस्थानी होती. त्याखालोखाल हिंदुस्थान युनिलिव्हर, सन फार्मा, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि टीसीएसच्या शेअर्समध्ये १.२८ ते १.७५ टक्क्यांची वाढ झाली. घसरणीतील शेअर्स (Top Losers): ट्रेंट (Trent) या शेअरमध्ये सर्वाधिक ८.६२ टक्क्यांची मोठी घसरण झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक आणि इंडिगो या शेअर्समध्ये १.८१ ते ४.४२ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. दरम्यान, आज एकूण ४,३४९ शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी १,६६१ शेअर्स वधारले, तर २,५२० शेअर्समध्ये घसरण झाली. १६८ शेअर्स स्थिर राहिले. विशेष म्हणजे, आज १४३ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला, तर १२५ शेअर्सनी वर्षातील नीचांकी स्तर गाठला.