मुंबई : भारतीय रुपयाचे मूल्य निचांकी पातळीवर असतानाच भारत- अमेरिका करार होण्याची शक्यता स्पष्ट होत नाही. अशा परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदाराकडून विक्री चालू असल्यामुळे सलग पाचव्या दिवशी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले. निर्देशांक घसरत आहेत. मात्र विक्रीचा जोर कमी आहे. ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब समजली जाते. गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 77 अंकांनी कमी होऊन 84,481 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ तीन अंकांनी कमी होऊन 25,815 अंकावर बंद झाला. ऊर्जा, वाहन आणि औषधी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. माहिती तंत्रज्ञान. धातू आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या खरेदीमुळे निर्देशांकांची जास्त हानी झाली नाही. सन फार्मा, टाटा स्टील, पावर ग्रीड, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, एअरटेल या कंपन्याच्या शेअरची विक्री झाली. तर टीसीएस, टेक महिंद्रा, अॅक्सिस बँक, एचसीएल टेक्नॉलॉजी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. रॅलीगेअर ब्रोकिंग या कंपनीचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले की जागतिक पातळीवरील परिस्थिती कमालीची अनिश्चित आहे. त्याचबरोबर चलन बाजारात संदिग्धता कायम असल्यामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे निर्णय घणे अवघड झाले आहे. अशा संदिग्ध परिस्थितीत गुरुवारी मिडकॅप वाढला तर स्मॉल कॅप कमी झाला. माहिती तंत्रज्ञान, सेवा, वित्तीय सेवा या क्षेत्राचे निर्देशांक वाढले तरी इतर क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले. जिओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, सध्या शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या लाटा चालू आहेत. अशा परस्थितीत निर्देशांक अल्प प्रमाणात कमी होत आहेत. आता रिझर्व बँकेने रुपयाचे मूल्य स्थिर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे काही गुंतवणूकदार खरेदीसाठी पुढाकार घेत असल्याचे वातावरण आहे. मात्र जोपर्यंत भारत- अमेरिका व्यापार करार होत नाही तोपर्यंत निर्देशांकांना दिशा मिळण्याची शक्यता कमी आहे. खनिज तेलाचे दर सध्या कमी पातळीवर आहेत.ही भारताच्या दृष्टिकोनातून जमिनीची बाजू असल्याचे समजले जाते. क्षेत्र घट ऊर्जा 1.1% नैसर्गिक वायू 0.81% भांडवली वस्तू 0.80% युटीलिटीज 0.75 % इंडस्ट्रियल्स 0.66%