Rupee Vs Dollar: खनिज तेलाचे दर काही प्रमाणात वाढत असताना परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजार व कर्जरोखे बाजारातून विक्रीचा सपाटा चालू केला आहे. त्यामुळे शुक्रवारी भारतीय रुपयाचा भाव पुन्हा 30 पैशांनी कोसळून 91.88 रुपये प्रति डॉलर या निचांंकी पातळीवर गेला. सकाळच्या सत्रात रुपयाचा भाव 92 रुपये प्रति डॉलरपेक्षा कमी झाला होता. मात्र नंतर त्यामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली. 2025 मध्ये पाच टक्क्यांनी कोसळला एक जानेवारीपासून रुपयाचा भाव 200 पैशानी म्हणजेच दोन टक्क्यांनी कोसळला आहे. 2025 मध्ये रुपयाचा भाव पाच टक्क्यांनी कोसळला होता. मात्र या महिन्यात पहिल्या 22 दिवसातच रुपयाचा भाव दोन टक्क्यांनी कोसळला आहे. त्यामुळे रुपयांसमोर अनेक अडथळे निर्माण झाले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात विश्लेषकाने सांगितले की, अमेरिकेने सुरू केलेले व्यापार युद्ध आणि भूराजकीय तणाव या कारणामुळे जगभरात डॉलरची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर आयातदाराकडूनही डॉलरची मागणी वाढत आहे. रुपया कमकुवत राहण्याची शक्यता अशा परिस्थितीत आगामी काही काळ तरी रुपया कमकुवत राहण्याची शक्यता आहे. जर डॉलर कमकुवत झाला आणि रिझर्व बँकेने हस्तक्षेप केला तर काही प्रमाणात रुपया स्थिर होऊ शकतो असे सांगण्यात आले. अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धामुळे आणि अमेरिकेची आर्थिक परिस्थिती बिघडत चालल्यामुळे जागतिक पेच प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन डॉलरचे मूल्य दर्शविणारा डॉलर इंडेक्स शुक्रवारी 0.01 टक्क्यांनी वाढून 98.36 अंकावर गेला. हा निर्देशांक जागतिक सहा चलनाच्या तुलनेत तयार केला जातो. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक शुक्रवारी याच कारणामुळे जवळजवळ एक टक्क्याने कोसळले. याचा नकारात्मक परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री चालूच परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची शेअर बाजारात विक्री चालूच असून या गुंतवणूकदारांनी गुरुवारी 2,549 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करून नफा काढून घेतला. रुपया कमकुवत असल्यानंतर आणि डॉलर वधारत असल्यानंतर या गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात फारसा नफा मिळत नाही. त्यामुळे भारताबरोबरच इतर वेगाने विकसित होणार्या देशातूनही परदेशी संस्थागत गुंतवणूकदार गुंतवणूक काढून डॉलरकेंद्री वित्तीय उत्पादनात गुंतवणूक करीत आहेत. त्यामध्ये अमेरिकेचे कर्जरोखे आणि सोने, चांदी इत्यादीचा समावेश असल्याचे समजले जाते. हेही वाचा – Share Market Falls: शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’; सेन्सेक्स 770 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटींचे नुकसान