नवी दिल्ली: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरील ‘Grok’ या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सुविधेचा गैरवापर करून महिलांचे अश्लील आणि आक्षेपार्ह फोटो प्रसारित केले जात असल्याच्या तक्रारींची केंद्र सरकारने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘X Grok’ ला एक नोटीस बजावली असून, त्यामध्ये असा सर्व आक्षेपार्ह मजकूर प्लॅटफॉर्मवरून त्वरित हटवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणावर काय पावले उचलली, याचा सविस्तर कारवाई अहवाल ७२ तासांच्या आत सरकारला सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० आणि माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ अंतर्गत असलेल्या वैधानिक जबाबदाऱ्यांचे पालन न केल्याबद्दल ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ‘X’ च्या ‘Grok’ या एआय सुविधेचा वापर करून काही युजर्स महिलांना लक्ष्य करत असून, त्यांचे बनावट आणि लैंगिकदृष्ट्या उघड चित्र-व्हिडिओ तयार करत असल्याचे समोर आले आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या संदर्भात माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार केली होती आणि अशा कंटेंटवर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारने ही आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्रालयाने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारे एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली सामग्री केवळ वैयक्तिक गोपनीयतेचा भंग करत नाही, तर ती महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लावून लैंगिक छळाला सामान्य बनवण्याचे काम करत आहे. सरकारने ‘X’ ला बजावले आहे की, त्यांनी या प्रकरणात मुख्य अनुपालन अधिकाऱ्याची भूमिका स्पष्ट करावी आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ अंतर्गत अनिवार्य असलेल्या रिपोर्टिंग नियमांचे पालन करावे. जर ७२ तासांच्या आत समाधानकारक कारवाई झाली नाही किंवा अहवाल सादर केला नाही, तर सरकार ‘X’ वर कठोर कायदेशीर कारवाई करेल, असा इशाराही या पत्रातून देण्यात आला आहे.